लांजा
: कोरोनाचे संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन ना बँजो, ना नाशिक बाजा, ना ढोल-ताशांच्या गजरात केवळ ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात लांजा तालुक्यातील ११ हजार ५७० घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यात आले.
कोरोनामुळे गणेशोत्सव कार्यक्रम मोठ्या पद्धतीने न करता साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आणि त्याला प्रतिसाद देत भाविकांनी केवळ नामगजरातच गणपती बाप्पाचे स्वागत केले. गेले पाच दिवस गणपती बाप्पा घरामध्ये विराजमान झाल्यानंतर प्रत्येक घरामध्ये आनंदाचे मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी वाड्या-वस्त्यांमध्ये आरत्या आणि भजनाचे सूर ऐकू येत होते.
मंगळवारी सायंकाळी तालुक्यातील ११ हजार ५७० घरगुती गणपती बाप्पाचे निरोप देण्यात आला. ग्रामीण तसेच शहरातील नागरिकांनी कोरोनाचे संकट असल्याने गणपती विसर्जन घाटावर गर्दी करू नये, यासाठी नगर पंचायतीने कृत्रिम तलावाची उभारणी केली होती. लांजा शहरातील ओझर, बेनी नदी येथे गणपतीचे विसर्जन करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.