राजापूर : समाेरील फोटो पाहिल्यावर व्यासपीठावरून खुद्द महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे आपल्याशी संवाद साधताहेत असेच वाटते. मात्र, हा फोटो नसून एका उदयोन्मुख चित्रकाराने आपल्या हस्तकौशल्यातून साकारलेली ही छबी असल्याचे आपल्या लक्षात आल्यावर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. हे हुबेहूब चित्र साकारलेय रत्नागिरीतील स्केच आर्टिस्ट नितीश सिद्धार्थ जाधव याने.
नितीश हा मूळचा संगमेश्वर तालुक्यातील फुणगूसचा सुपुत्र आहे. सध्या तो रत्नागिरी कुवारबाव येथे राहतो. राजापूर नगर परिषदेतील सेवानिवृत्त लिपिक सिध्दार्थ जाधव यांचा तो चिरंजीव आहे. नितीश याने रेखाकलेचे कोणतेही शिक्षण न घेता केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर एक चित्रकार म्हणून ओळख निर्माण करत यश मिळविले आहे. विविध व्यक्तींची रेखाचित्रे काढणे हा त्याचा आवडता छंद आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे हे वेगळे राजकीय वलय असणारे व्यक्तिमत्त्व. त्यांचे कार्यकर्तृत्व शब्दात मांडणे जितके अवघड तसे त्यांचे रेखाचित्र साकारणे आव्हानात्मक. पण नितीशने हे आव्हान पेलत त्यांचे व्यक्तीचित्र हुबेहूब साकारले. त्यांचे व्यासपीठावरून बोलतानाचे नितीश याने साकारलेले रेखाचित्र पाहिल्यावर खुद्द नारायण राणे आपल्याशी संवाद साधत आहेत असा भास व्हावा एवढी अचूकता नितीशने या रेखाचित्रात आणली आहे. नारायण राणे यांच्या आगामी रत्नागिरी दौऱ्याच्यावेळी, त्यांची भेट घेऊन हे चित्र त्यांना भेट देण्याचा नितीश याचा मानस आहे.
------------------------
वाढदिवसाला भेट देतात चित्र
त्याच्या चित्राची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वदूर पसरल्याने, त्याच्याकडून चंद्रपूर, परभणी, औरंगाबाद, पुणे, कणकवली येथून आपल्या प्रिय व्यक्तींचे स्केच काढण्यासाठी मागणी हाेत आहे़ काही मित्र- मैत्रिणी आपल्या आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाची भेट देण्यासाठी स्केचा पर्याय निवडतात. अनेकांनी नितीशकडून तशी स्केच काढून नेलेली आहेत. विविध राजकीय नेत्यांची, सेलिब्रेटींचीही नितीश याने स्केच काढलेली आहेत. सिद्धहस्त कलाकारांच्या रेखाचित्रांच्या पंक्तीतही उजवी ठरेल अशी त्याची कलाकृती म्हणजे त्याने आपल्या आजीचे साकारलेले स्केच.