चिपळूण : दहावीनंतर शिक्षणासाठी धुळ्याहून चिपळुणात आलेल्या नीलेश अहिरे याने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोबाइल शॉपीच्या व्यवसायात जम बसवला. तीन वर्षे नातेवाईक व भाड्याच्या खोलीत आनंदी जीवन जगत असताना तीन महिन्यांपूर्वीच ८ मे रोजी विवाह बंधनात अडकला. आता कुठे नव्या आयुष्याला सुरुवात झाली होती. या वेलीला बहर येण्याआधीच अचानक दोघांनाही आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप पुढे आले नसले, तरी त्यांचा संसार अर्ध्यावरच मोडल्याचे सत्य आता नातेवाइकांसह सर्वांनाच मान्य करावे लागणार आहे.मूळचा साक्री (धुळे) येथील नीलेश अहिरे व पत्नी अश्विनी अहिरे यांनी गांधारेश्वर येथील पुलावरून वाशिष्ठी नदीत उडी घेतल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या दाम्पत्याचा गुरुवारी दुसऱ्या दिवशीही दाभोळ खाडीत शोध सुरू होता. खाडीकिनाऱ्यावरील सर्व गावांमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. एनडीआरएफ पथकासह आहिरे यांच्या नातेवाइकांनी बोटीच्या माध्यमातून खाडीत शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. एनडीआरएफ पथक, पोलिस, शासकीय अधिकारी व कर्मचारी, आहिरे यांचे नातेवाईक वाशिष्ठी नदीसह दाभोळखाडीत अजूनही त्यांचा शोध घेत आहेत.
नीलेशचे वडील शासकीय सेवेत नोकरीला असून, नीलेशला एक लहान भाऊ आहे. दहावीनंतर तो गाव सोडून चिपळूणला नातेवाइकांकडे आला होता. येथील डीबीजे महाविद्यालयात बारावी झाल्यानंतर त्याने मोबाइल दुरुस्तीचे शिक्षण घेतले आणि बसस्थानकाजवळ मोबाइल शॉपी सुरू केली होती. शांत व मृदू स्वभावाने त्याने ग्राहक जोडून व्यवसायात जम बसवला. लग्नापूर्वी ३ ते ४ वर्षे तो स्वतंत्रपणे भाड्याच्या घरात राहत होता. कष्टातून केलेल्या व्यवसायाच्या जोरावर त्याने जम बसवला होता. घरच्यांकडून काही मागण्याची वेळ त्याच्यावर आली नाही. आता सारे काही सुरळीत सुरू असताना या दाम्पत्याने नदीत उडी घेण्याचा निर्णय का घेतला, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. याप्रकरणी चिपळूण पोलिस अधिक तपास करीत आहेत.
सारे काही सुरळीतगावाकडील अश्विनीसोबत ८ मे रोजी त्याचा विवाह झाला. विवाहानंतर जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळी ते फिरायलाही गेले होते. अश्विनीच्या वाढदिवसानिमित्त काही दिवसांपूर्वी आई, मामाही येथे काही दिवस राहिले होते. सर्व सुरळीत असल्याने २ जुलैनंतर आई गावाकडे निघून गेली; पण आता अचानक सारे काही बदलून गेले आहे.