चिपळूण : वाशिष्ठी नदीत उडी मारण्याआधी अश्विनी आहिरे हिने आपल्या माहेरी फोन केला होता. त्यामुळे सर्वांची धावाधाव उडाली. ती गांधारेश्वर पुलावर असल्याचे समजल्यानंतर नीलेश तातडीने तिकडे निघाला. मात्र तो पोहोचेपर्यंत अश्विनीने पाण्यात उडी घेतली होती. त्यामुळे त्यानेही घरच्यांशी संपर्क साधला आणि अश्विनीपाठोपाठ पाण्यात उडी घेतली.नवदाम्पत्याच्या या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे चिपळूण शहरातच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणातील अधिक माहिती पुढे येऊ लागली आहे. बुधवारी ३० रोजी नीलेश नेहमीच्या वेळेत मोबाइल शॉपीमध्ये आला होता. मात्र नातेवाईकांनी संपर्क साधून त्याला घरी जाऊन येण्यास सांगितले. तत्काळ त्याने घर गाठले असता तेथे पत्नी घरी नसल्याचे निदर्शनास आले. तिचा शोध घेतला असता ती गांधारेश्वर पुलावर असल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली.दरम्यान, अश्विनीनेच आत्महत्या करण्यापूर्वी घरच्या लोकांशी संवाद साधून माहिती दिली होती. ती गांधारेश्वर पुलावर असल्याचे समजताच नीलेशनेही दुचाकीने पुलावर धाव घेत पत्नीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे ती सापडली नाही. पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच त्यानेही नदीत उडी मारण्याचा निर्णय घेतला.
त्यापूर्वी त्याने नातेवाईकांशी संपर्क साधल्याची माहितीही उपलब्ध झाली. असे टोकाचे पाऊल उचलू नको, आम्ही तुझ्या पाठीशी असल्याचा धीर सासरच्या लोकांकडून त्याला देण्यात आला. परंतु त्याने थेट नदीत उडी घेतल्याचे समजते. अश्विनी हिला चांगले पोहता येत होते, मात्र नीलेशला पोहता येत नव्हते. हे दोघेही अजून बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे.अवघ्या १८ मिनिटांत घटनास्थळ गाठले!अश्विनी वाशिष्ठी नदीत आत्महत्या करत असल्याची माहिती घरच्या मंडळींना व नातेवाईकांना मिळाल्यानंतर सगळ्यांची पळापळ झाली. त्याचवेळी गावावरून वहाळ येथील नातेवाईकांना संपर्क साधण्यात आला. त्या नातेवाईकांनी क्षणाचा वेळ घालवता गाडी घेऊन तब्बल ३० किलोमीटरचे अंतर अवघ्या १८ मिनिटात कापून थेट घटनास्थळ गाठले, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.