देवरूख : आई-वडील आपल्यावर संस्कार करतातच. मात्र, शाळा आणि गुरूजन जे काही शिकवतात ते शिक्षण जीवनाला दिशा देणारं ठरतं, असे सांगत शाळेत मिळालेली शिक्षा म्हणजे पट्टी बोलते, अंगठे धरलेले लक्षात राहते, अशा चुकांमधून काय चांगलं करावं ते समजते, म्हणून चुका करा, नवनवीन चुका करा म्हणजे चांगले काय ते तुम्हाला समजेल आणि तुम्ही चांगले नागरिक बनाल, असे मत प्रसिध्द सिनेनाट्य अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले.देवरूखजवळच्या ताम्हाने पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यामंदिर, ताम्हाने शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दामले उपस्थित होते. त्यांच्यासोबत पनवेलचे उद्योजक आणि दुनियादारी समुहाचे प्रमुख समीर सप्रे, कोल्हापूरचे राजन गुणे, पत्रकार प्रमोद कोनकर, कोकण रेल्वेचे अधिकारी महेश पेंडसे, कौस्तुभ कागलकर, प्रसिध्द आॅर्गन वादक बाळासाहेब दाते, संस्थाध्यक्ष शशिकांत सप्रे, सचिव अशोक सप्रे, मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील, अप्पा पाध्ये, आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी प्रत्यक्ष जीवनातील अनुभव कथन करत आपल्या शालेय जीवनाला उजाळा दिला. प्रत्येक नागरिक हा जन्मजात कलाकार असतो, असे सांगत शाळा ही संस्कार देणारी आहे, आपण काय आहोत हे शाळेतच आपल्याला समजते, आपल्या शाळेचा निकाल १०० टक्के लागणारच आहे. तरीही खरे जीवन काय हे इथून बाहेर पडल्यावरच समजणार आहे. इथे मिळालेले शिक्षण हे बाहेरचे जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आपले म्हणणे ठामपणे मांडणे हे आपल्याला शाळेतच शिकवले जाते. मी शालेय जीवनात अभ्यासात फार काही करू शकलो नाही. पण शाळेच्या संस्कारांमुळे मी चांगला कलाकार होऊ शकलो, असे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळ््या गप्पा मारल्या. प्रास्ताविक अशोक सप्रे यांनी केले तर सूत्रसंचालन सनगरे यांनी केले. (प्रतिनिधी)गीतातून जिंकली मने...प्रशांत दामले यांचे भाषण सुरू असताना विद्यार्थ्यांनी त्यांना ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’ हे लोकप्रिय गाणं सादर करण्याची विनंती केली. मात्र, दामले यांनी विद्यार्थ्यांना संदेश देण्यासाठी कवीवर्य मंगेश पाडगावकर यांची ‘सांगा कसं जगायचं?’ ही कविता सादर करत उपस्थित विद्यार्थ्यांची मने जिंकली. यामुळे कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली होती.
नवनवीन चुकाच चांगले काय ते समजावतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2016 00:17 IST