दापोली : मागील वर्षी झालेले निसर्ग चक्रीवादळ व नुकत्याच झालेल्या ताैक्ते चक्रीवादळाचा फटका पर्यटन क्षेत्रासह गृहउद्योग अर्थात लघु उद्योगाला बसल्यामुळे अनेक छोटे-मोठे व्यवसाय बंद पडले आहेत. यामुळे होणारी कोट्यवधींची उलाढाल थंडावली आहे.
दापोली तालुका पर्यटन क्षेत्र आहे. त्यामुळे पर्यटकांकडून सुका मेव्यासह आंबा, आंबापोळी, आंबावडी, फणसपोळी, फणसवडी, तळलेले गरे, आमरस, कोकम सरबत अशा विविध पदार्थांना विशेष मागणी असते. या सर्व पदार्थांच्या विक्रीतून दापोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते व मोठी आर्थिक उलाढाल होते. तालुक्यातील दाभोळ, कोळथरे, बुरोंडी, करजगाव, आसूद, मुरूड, आंजर्ले, मुर्डी, केळशीसह अन्य काही भागात हा व्यवसाय तेजीत चालतो. पुणे, मुंबई व इतर परजिल्ह्यातून आलेल्या पर्यटकांना हे पदार्थ आवडीचे आहेत. दरवर्षी या व्यवसायातून संपूर्ण तालुक्यात एक ते दीड कोटींच्या घरात उलाढाल होत असल्याचे समजते.
-------------------------
गतवर्षी निसर्ग चक्रीवादळाने आंबा, फणस, कोकम या महत्त्वपूर्ण झाडांचे मोठे नुकसान केले. त्यात शिल्लक राहिलेली आणि फळे आलेली झाडे होती, त्या झाडांची तौक्ते चक्रीवादळाने नासधूस केली. त्यामुळे यावर्षीपासून काही वर्ष हा व्यवसाय मंदावलेल्या अवस्थेत राहणार आहे. अनेकांनी यावर्षी कोकणी मेव्यापैकी कोणताही खाद्यपदार्थ बनवला नाही़
- दिनेश परांजपे, व्यावसायिक, मुर्डी