शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

राजापुरातील एक संग्रहालय! कलेचं, हौसेचं अन् जिद्दीचं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 14:14 IST

जिद्द असेल आणि काहीतरी नवीन करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आपल्या घराचे आणि आपल्या माणसांचे नाव मोठे करण्याची तळमळच आपल्याला काहीतरी नवीन करण्याची ऊर्जा देते.

- अरुण आडिवरेकर

रत्नागिरी - जिद्द असेल आणि काहीतरी नवीन करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आपल्या घराचे आणि आपल्या माणसांचे नाव मोठे करण्याची तळमळच आपल्याला काहीतरी नवीन करण्याची ऊर्जा देते. आपल्या हौसेला मिळालेली जिद्दीची साथ या जोरावरच सोगमवाडी (राजापूर) सारख्या दुर्गम गावात कला, वस्तू आणि काष्ठशिल्पांचे संग्रहालय उभे राहिले आहे. 

राजापूर तालुक्यातील अतिशय दुर्गम अशा सोगमवाडी गावात १८९० साली बांधण्यात आलेला एक बंगला आहे. हा बंगला म्हणजे त्याकाळचा वकील बंगला, बाग बंगला किंवा सावकाराचा बंगला होय. या बंगल्याची रचना पाहिली तर ब्रिटीशकालीन बांधकाम आजही तग धरून असल्याचे दिसून येईल. याच बंगल्याच्या दिवाणखान्यात बबन नारकर यांनी हे संग्रहालय उभारले आहे. 

घरात असलेल्या वडिलोपार्जित वस्तूंचे जतन झाले पाहिजे, असे त्यांनी मनाशी ठरविले. पणजोबांपासून असलेली तांबे, पितळेची भांडी त्यांनी जपून ठेवली. पुणे येथील एका पुरातन वस्तूंच्या संग्रहालयाची प्रेरणा घेऊन त्यांनी आपला हा पुरातन बंगला संग्रहालय म्हणून नावारूपाला आणण्याचा निश्चय केला. अनेक ठिकाणी संग्रहालयांमध्ये वस्तूंपेक्षा त्यांचे काठ किंवा एखादा अवशेषच शिल्लक आहे. पण बबन नारकर यांच्या या संग्रहालयात पूर्ण भांडी असल्याचे पाहायला मिळते. या संग्रहालयात पणजोबांच्या पायातील खडाव्यापासून दळणाचं जातं, पाणी तापवण्याचं तपेलं, बुंदी काढण्याचा झारा, पाटा - वरवंटा, शेवया करावयाचा लाकडी साच्या, काटवट, व्यायामासाठी वापरण्यात येणारी लाकडी मगदूल जोडी, मोदक तयार करण्याचे भगून, पितळेची किसनी अशा नाना त-हेच्या वस्तू आहेत.

त्यांनी पुरातन वस्तूंबरोबरच काष्ठशिल्पाची निर्मिती केली आहे. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करून त्यांनी या वस्तू जतन केल्या आहेत. अगदी चुलीसाठी जळावू म्हणून वापरण्यात येणा-या लाकडांचाही त्यात समावेश आहे. करवंटीपासून गणेशमूर्ती त्याचबरोबर सोडणे, बांबूमूळ, नारळ, शिंपले, झाडांची पाळे, फांद्या, खोड, बांद बांडगूळ यापासून प्राणी, पक्षी, सर्प, मासे, खेकडे, झिंगे, तलवारी, कासवे त्यांनी तयार केली आहेत.

याचबरोबरच त्यांच्या या संग्रहालयात जुने ग्रंथ आणि कायदा पुस्तकांचाही समावेश आहे. ‘शेगावचे गजानन महाराज, योगविशिष्ठी, रामायण, महाभारत, हरी विजय’ यासारखे ग्रंथ याठिकाणी पाहायला मिळतात. हे ग्रंथ चित्र स्वरूपात असल्याचे बबन नारकर सांगतात. एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा दिली तर ती शिक्षा कोणत्या स्वरूपाची आहे, हे दर्शविणारी चित्रे यामध्ये आहेत.

रिटायर व्हायचं नाही

आयुष्यात कधीच रिटायर व्हायचं नाही, असे मी ठरवले होते. त्यामुळेच ‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो’ या कंपनीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. आपल्या आजूबाजूला भरपूर काही आहे, फक्त त्याकडे पाहण्याची दृष्टी हवी. निसर्गात ५० ते ८० टक्के काष्ठशिल्प असतात. फक्त आपण त्याकडे बारकाईने पाहून त्याला योग्य तो आकार दिला पाहिजे. जुन्या वस्तूंचे मोल न कळल्यामुळेच त्या कालबाह्य झाल्या आहेत. त्यांचे जतन करण्याची गरज आहे. - बबन नारकर

ग्रंथसंपदा

जुन्या ग्रंथांचाही ठेवा बबन नारकर यांनी जपून ठेवला आहे. ग्रंथांमध्ये मोडीमधील हिशोबाची नोंदवही आहे. या ग्रंथांच्या छपाईच्या अगोदर २ रूपये, ३ रूपये, ५ रूपये आगाऊ  दिले जात होते. त्याचा उल्लेखही या ग्रंथांमध्ये करण्यात आला आहे. त्याकाळातील कायद्याची पुस्तकेही याठिकाणी असून, गुन्हे तेच पण गाव, नाव, वाडी, कायदे कलमे आता बदलली आहेत.

चित्रांची रेखाटणी

बबन नारकर यांनी गणपती, छत्रपती शिवाजी महाराज, परशुराम आणि दत्ताच्या चित्रांचा समावेश आहे.  गणपतीने मुलींचे सैन्य तयार करून मद्रासमध्ये मुलींची सुटका केली. हा विजय मिळवून परत येत असताना पहिले दार कोकणचे लागले. त्यावेळी विजयकुमार यांनी गणपतीचे जंगी स्वागत केले. म्हणूनच कोकणात गणेशोत्सव साजरा केला जातो. शिवाजी महाराज यांचे हिशोबनीस बाळाजी राजापूरचे, परशुरामने समुद्र हटवून कोकणभूमी तयार केली म्हणून त्यांची चित्रे नारकर यांनी रेखाटली.

झुरळांना पकडण्यासाठी बंदूक

कोणताही कीटक मारल्यानंतर तो पकडण्याची भीती वाटते, म्हणूनच बबन नारकर यांनी एक छोटीशी बंदूक तयार केली आहे. या बंदुकीने झुरळ, विंचू असे प्राणी उचलून टाकता येतात.

आजही मजबूत बांधकाम

वकील बंगल्याच्या बांधकामासाठी बोटीतून सामान आणण्यात आले होते. त्यावेळी गलबते घराशेजारील बागेत यायची. फणस, साग, बाभूळ, खैर, शिसम अशा लाकडांचा वापर करून या घराची उभारणी करण्यात आली आहे. बाहेरच्या दारावर कोणी आले तरी घरातून कोठूनही दिसू शकेल, अशा गुप्त खिडक्या ठेवण्यात आल्या आहेत.

स्वातंत्र्याची बैठक याच घरात

ज्या दिवाणखान्यात हे संग्रहालय उभारण्यात आले आहे, त्याच दिवाणखान्यात ब्रिटीशांना एकजूट दाखविण्यासाठी २६ जानेवारी १९४० रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त सभा आयोजित करण्यात आली होती. याबाबत कै. भानू परशुराम सोगम यांना १९ जानेवारी १९४० रोजी पत्र आले होते. हे पत्र आजही पाहायला मिळते.

बाग म्हणजे कृषी विद्यापीठच

याच बंगल्याच्या पाठीमागे बाग आहे. ही बाग म्हणजे त्यावेळचे कृषी विद्यापीठच होते. या बागेत पेरूची सर्व प्रकारची झाडे, जायफळाचे २०० फूट उंच झाड, मोसंबी, नारंगी, संत्रा, डाळिंब, म्हावळुंग, कॉफी, पोपनीस, लिंबू अशी झाडे होती. तर जाई, जुई, मोगरा, कृष्णकमळ, सोनचाफा, नागवेल, नागचाफा, सफेद चाफा, आंब्याची सर्व प्रकारची झाडे होती. याच बागेत ब्रिटीशकालीन तळे असून, त्याकाळी पिण्यासाठी त्याचे पाणी वापरले जात होते.