अरुण आडिवरेकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : काेराेनाचा संसर्ग वाढत असल्याने लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. काेराेना नियंत्रणात आणण्यासाठी निर्बंध लादण्यात आले असले तरी माॅर्निग वाॅकसाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या काही कमी झालेली नाही. रत्नागिरी शहरासह आजूबाजूच्या परिसरात अनेकजण माॅर्निंग वाॅकसाठी बाहेर पडत आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई हाेत नसल्याने तेही बिनधास्त झाले आहेत.
काेराेनाचा संसर्ग अजूनही कमी झालेला नाही. हवेतून वेगाने पसरणाऱ्या या संसर्गापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी संचारबंदी जाहीर करण्यात आली असून, नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. केवळ सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, माॅर्निंग वाॅकची सवय पडलेले अनेकजण अजूनही घराबाहेर पडत आहेत. शहरातील मांडवी, थिबा पॅलेस, साळवी स्टाॅप, हिंद काॅलनी याबराेबरच नाचणे, शिरगाव, उद्यमनगर या भागात माॅर्निंग वाॅकसाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तरुणांसह ज्येष्ठ, महिलांही फिरायला बाहेर पडत आहेत. अनेकजण ताेंडाला मास्क न लावता तर काहीजण हनुवटीला मास्क लावून फिरत असतात. त्यामुळे काेराेनाचा संसर्ग वाढण्याची भीती अधिक आहे.
पाेलिसांकडूनही सूट
काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात अनावश्यक फिरणाऱ्यांवर पाेलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. पण, ही कारवाई मर्यादित वेळेतच केली जात आहे, तर दुकानांसाठी ठरवून दिलेल्या वेळेत केवळ दुकानांची पाहणी करण्यात येते. पण माॅर्निंग वाॅकसाठी बाहेर पडणारे पाेलिसांच्या कारवाईतून सुटत आहेत. अनेकजण अंतर्गत मार्गाचा वापर करत असल्याने तेही वाचतात.
सकाळच्या प्रसन्न वातावरणात शुद्ध हवा घेण्यासाठी अनेकजण माॅर्निंग वाॅकसाठी बाहेर पडतात. सध्या काेराेनाचा संसर्ग इतका वाढला आहे की, हवेबराेबर काेराेनाचा विषाणू शरीरात जाण्याचा धाेका अधिक आहे. त्यामुळे खुली हवेपेक्षा विषाणूच शरीरात जाऊ शकताे.
काेराेनाची भीती तर आहेच. पण, घरात बसून सांधे जखडतात. दिवसभर घरात बसून कंटाळाही येताे. सकाळच्या वेळेत गर्दीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे पाय माेकळे करण्यासाठी घराबाहेर पडताे. ताेंडाला मास्क लावूनच बाहेर पडताे आणि घरात जाण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवूनच जाताे.
- ज्येष्ठ नागरिक
काेराेनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे भीतीही आहेच. आपण बाधित झालाे तर घरातील मंडळींचे काय हाेईल, याची चिंता असतेच. पण, सकाळी फिरायला येणाऱ्यांची खूपच कमी असते. त्यामुळे संसर्ग हाेण्याचा धाेका कमी आहे. त्यातही घरापासून जास्त दूर जाणे टाळताे. याेग्यती खबरदारी घेऊनच आपण घराबाहेर पडताे.
- नागरिक