लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : मोबाइल व्हॅक्सिनेशन हा एक स्तुत्य उपक्रम आहे़ आणखी २ नव्या गाड्या उपलब्ध करून शहरात ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणार असल्याचे सांगत हा पॅटर्न रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवणार असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रविवारी केले. ते शहरातील राधाकृष्ण मंदिर येथे लसीकरण शुभारंभावेळी बोलत होते.
यावेळी खासदार विनायक राऊत, नगराध्यक्ष प्रदीप साळवी, उद्योजक किरण सामंत, महेश म्हाप, बिपीन बंदरकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे, राजन मलुष्टे, सौरभ मलूष्टे, हेमंत वणजू, दादा वणजू, विजय मलुष्टे, डॉ. लक्ष्मीकांत माने, अमेय वीरकर, केतन शेट्ये, मनोज साळवी, महेश संसारे उपस्थित होते.
रत्नागिरीत शहरात सुरू करण्यात आलेले माेबाइल व्हॅक्सिनेशन अनधिकृत असल्याचे सांगत भाजपच्या युवा माेर्चा अध्यक्षांनी आक्षेप घेतला हाेता. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारही केली. त्यानंतर काहींनी संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त केल्या. ज्येष्ठ नागरिकांची हाेणारी गैरसाेय दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लसीकरण माेहिमेची जबाबदारी अखेर नगर परिषदेने घेतली. हा कार्यक्रम रविवारी शहरातील राधाकृष्ण मंदिर येथे पार पडले. या शिबिराला मंत्री उदय सामंत यांनी भेट देऊन उपक्रमाचे काैतुक केले.
यावेळी ते म्हणाले की, लसीकरण केंद्रावरची गर्दी टाळण्यासाठी मोबाइल व्हॅक्सिनेशन उत्तम पर्याय आहे. रत्नागिरी शहरात आणखी दोन गाड्या उपलब्ध करून ज्येष्ठ नागरिकांचे व्हॅक्सिनेशन पूर्ण करण्यात येईल. दाेन गाड्यांमध्ये १०० लसींच्या मात्रा ठेवण्यात येतील. हाच पॅटर्न रत्नागिरी तालुक्यातही राबवण्यात येईल. त्यासाठी तीन गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील. रत्नागिरी मतदार संघात व्हॅक्सिनेशन यशस्वी झाले, तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हा पॅटर्न राबवून ६० वर्षांवरील नागरिकांना त्यांच्या दारात जाऊन लसीकरण करण्याची माेहीम राबविली जाईल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.