फोटो ओळी : जॉन्सन अॅण्ड जॉन्सन संस्थेच्या फिरत्या होल्वो व्हॅनचे उद्घाटन डॉ. सुवर्णा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर जॉन्सन अॅण्ड जॉन्सनच्या प्रशिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : डेरवण येथील वालावलकर रुग्णालय डायग्नोस्टिक अॅण्ड रिसर्च सेंटरमधील विद्यार्थ्यांना जॉन्सन अॅण्ड जॉन्सन संस्थेच्या ‘होल्वो व्हॅन’च्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तीन दिवसीय कालावधीच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. या फिरत्या प्रशिक्षण उपक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या मेडिकल डायरेक्टर सुवर्णा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. नेताजी पाटील, डॉ. अमर बारवडे, डॉ. मुल्ल्या यांच्यासह संस्थेचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
या तीन दिवशीय प्रशिक्षणादरम्यान एमएमबीएस, पोस्ट गॅज्युएशन, सर्जन, गायनॅक, ऑर्थो यासह सुमारे ८५ विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. डेरवणसारख्या ग्रामीण भागात वालावलकर रुग्णालयाने उभारलेली जी शिक्षण पद्धती आहे, ती खरोखरच उत्तम आहे. कमी खर्चात आणि चांगले वैद्यकीय ज्ञान देण्याचे काम रुग्णालयाच्या माध्यमातून होत आहे. याचे आम्हाला अप्रूप वाटते. असे जॉन्सन अॅण्ड जॉन्सन संस्थेचे शैलेश चौगुले यांनी सांगितले. तर यावेळी सतत तीन दिवस विद्यार्थ्यांच्या सोबत असलेले डॉ. प्रशांत मुल्ल्या यांनी सांगितले की, या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना चांगले ज्ञान मिळत असताना. त्यांना टीश्यूज हाताळणे तसेच शस्त्रक्रिया करणे व शस्त्रक्रिया करताना वापरावयाचे बारकावे याचे परिपूर्ण ज्ञान त्यांना मिळत असल्याने ते भविष्यात चांगले सर्जन म्हणून नाव कमावतील यात शंका नाही, असा विश्वास व्यक्त केला. या प्रशिक्षणासाठी महेंद्रन नायडू, मोहसिन बांदेकर, विश्राम बिरमोळे, रविराज शिंदे यांनीही मेहनत घेतली.
चाैकट
सर्व प्रकारची माहिती
सन २०१८ पासून जॉन्सन अॅण्ड जॉन्सन संस्था संपूर्ण भारतातील विविध शासकीय व अशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अशा प्रकारचा उपक्रम राबवित आली आहे. विशेष म्हणजे या प्रशिक्षणामध्ये शस्त्रक्रियेसंदर्भात माहिती दिली जाते. सुचरिंग टेक्निक (टाके घालणे) ग्लोज घालणे, शस्त्रक्रियेची साधनसामग्री हाताळणे यासह विविध प्रकारच्या गुंतागुतीच्या शस्त्रक्रियेसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.