देवरुख : देवरूख शहरामध्ये दोन अपूर्ण अवस्थेतील स्वागत कमानी गेली कित्येक वर्षे पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत. या अर्धवट असलेल्या स्वागत कमानींचे फीत कापून व नारळ फोडून उद्घाटन करून संगमेश्वर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनोखे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
उपहासात्मक केलेल्या या उद्घाटनावेळी मनसेच्या सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक
व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. युयुत्सु आर्ते यांच्या हस्ते फीत कापण्यात आली तर मनसे पदाधिकारी यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला.
यावेळी तालुकाप्रमुख अनुराग कोचीरकर, सनी प्रसादे, ऋतुराज देवरुखकर, शेखर नलावडे, सचिन बने, मकरंद नलावडे, विनित बेर्डे, अश्फाक जेठी, संकेत देसाई, अनिल सागवेकर, चैतन्य बेर्डे, महेश गुरव, तेजस नटे आदी उपस्थित होते.
गेली काही वर्षे शहरातल्या या स्वागत कमानी अपूर्ण अवस्थेत आहेत. चोरपऱ्याजवळील एक तर मार्लेश्वर तिठा येथे दुसरी स्वागत कमान अपूर्णावस्थेत आहे. याकडे देवरूख नगरपंचायतीने लक्ष देणे गरजेचे बनले आहे. मनसेच्या या आंदाेलनानंतरही या कमानींचे काम पूर्ण हाेणार आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.