रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती
लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : तौक्ते चक्रीवादळात तालुक्यात लाखो रुपयांची हानी झाली आहे. कुणाच्या घरांची पडझड झाली तर कुणाचे गोठे जमीनदोस्त झाले. आंबा बागायतदारांचे तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुंबई - गोवा महामार्गावर कशेडी घाटातही एक वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे १ तास खोळंबली होती. खेड येथील युवा सेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह वृक्ष तोडून बाजूला केला. त्यानंतर खोळंबलेली वाहतूक सुरळीत झाली.
वादळामुळे झाडावरील सारा आंबा गळून पडल्याने आंबा बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
शनिवारी सायंकाळी ५ वाजता सुरु झालेले निसर्गाचे तांडव सोमवारी पहाटेपर्यंत सुरु होते. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे तालुक्यातील अनेकांच्या घरावरील कौले, पत्रे उडून गेले तर काही ठिकाणी घरांच्या भिंतींची पडझड झाली. तहसील कार्यालयाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार ४५ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. तर एका घराच्या भिंतीची पडझड झाली आहे. एका शेतकऱ्याच्या नागरांचा बैलही या वादळात बाधित झाला आहे. कोरोनामुळे धंदा व्यवसाय बंद असल्याने लगेच दुसरा बैल खरेदी करण्याची ऐपतही आता उरलेली नाही त्यामुळे करायचे काय, हा प्रश्न आहे.
सोसाट्याच्या वाऱ्याने ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. खेड - दापोली मार्गावरील मोकल बागेजवळ वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडल्याने हा मार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद झाला होता. ग्रामस्थ आणि वाहन चालक यांनी रस्त्यावर पडलेले झाड तोडून बाजूला केल्यावर हा मार्ग खुला झाला.
khed_photo181 खेड येथील युवासेना कार्यकर्त्यांनी कशेडी घाटात जाऊन रस्त्यात पडलेला वृक्ष तोडून बाजूला केला.