लोकमत न्यूज नेटवर्क
गुहागर : तालुक्यातील गुहागर शहरासह शृंगारतळी, आबलोली, तळवली आदी मुख्य बाजारपेठांतून संपूर्णत: दुकाने बंद ठेऊन लॉकडाऊनला प्रतिसाद दिला. कोणी नियमाचे उल्लंघन करू नये म्हणून नाक्यानाक्यावर पोलीस तैनात करण्यात आले होते.
राज्य सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी काही आवश्यक सेवा वगळून अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर गुहागर शहरात बहुतांशी दुकाने बंद होती. काही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच व्यापाऱ्यांना समज देत दुकाने बंद केली.
शृंगारतळी बाजारपेठ व्यापाऱ्यांनी शुक्रवारपासून सर्व दुकाने बंद केली. शनिवार व रविवारच संपूर्ण लॉकडाऊन असला तरी शृंगारतळी बाजारपेठ मंगळवारी उघडणार आहे. शनिवारी मात्र शृंगारतळी बाजारपेठ पूर्णत: बंद होती. गुहागर, असगोली भागात काही मच्छीमार असगोली समुद्रकिनारी मच्छी विक्री करत असताना पोलिसांनी हटकले. त्यानंतर किनारा असलेल्या सर्व नौका समुद्रात लावण्यात आल्या. याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता सांगितले की, लॉकडाऊनला सर्वच चांगले सहकार्य करत आहेत. अद्यापपर्यंत कोणावरही विशेष कारवाई केली नसल्याचे सांगितले.