चिपळूण : चार किलोमीटर लांब पार्किंग व्यवस्थेमुळे झालेली पायपीट आणि डोक्यावर कडाक्याचे ऊन असतानाही सळसळत्या तरुणाईने चिपळुणात रविवारी विक्रमी मोर्चा काढला. तरुणाईचा उत्साह, काळे टी शर्ट, हातात भगवे झेंडे, डोक्यावर भगव्या व पांढऱ्या टोप्या, भगवे स्कार्फ परिधान करुन नि:शब्द वातावरणात निघालेल्या मराठा क्रांती मोर्चामुळे चिपळुणात भगवा जनसागरच उसळल्याचे चित्र दिसत होते. सर्वाधिक गर्दीचा हा रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलाच मोर्चा होता. चिपळुणातील पवन तलाव मैदानात सकाळी ८ नंतर हळूहळू गर्दी वाढू लागली. ११.१५ वाजता मैदान पूर्णपणे भरले. वाहनांची पार्किंगची व्यवस्था लांब असल्याने मोर्चेकऱ्यांना चार-चार किलोमीटर चालत यावे लागत होते. प्रथम कोपर्डीतील घटनेचा निषेध करण्यात आला. कोपर्डी दुर्घटनेत बळी गेलेल्या भगिनीला तसेच उरी येथे शहीद झालेल्या १७ जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या मोर्चात जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, आजी-माजी खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यही सहभागी झाले होते. मोर्चाच्या अग्रभागी तरुणी होत्या. मोर्चाला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिम समाजातर्फे वाटेत ठिकठिकाणी पाणी तसेच सरबत वाटप केले. उपविभागीय कार्यालयासमोर तयार केलेल्या व्यासपीठावर श्वेता माने, सोनल दळवी, विनया म्हापदी, धनश्री मोरे, प्रिया जाधव, रोशनी साळवी या तरुणींच्या उपस्थितीत पायल घोसाळकर हिने निवेदनाचे वाचन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांना स्नेहल चव्हाण, स्नेहा सावंत, मानसी कदम, समृध्दी चव्हाण, वर्षा शिंदे, ऐश्वर्या मोहिते, अरुंधती राणे, समीक्षा विचारे, सेजल गायकवाड, निकिता दळवी, अंकिता सुर्वे यांनी निवेदन सादर केले. (प्रतिनिधी) शिस्तबद्धता चिपळुणातही अत्यंत शिस्तीमध्ये निघणारा मोर्चा अशी राज्यभरात ख्याती मिळवलेला मराठा क्रांती मूक मोर्चा चिपळुणातही त्याच शिस्तीत निघाला. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांना पवन तलावावर पाठवतानाच रांगेत पाठवले जात होते. तशाच रांगा पुढे मोर्चामध्येही सोडण्यात आल्या. त्यामुळे मोर्चा कोठेही विस्कळीत झाला नाही. पवन तलाव ते प्रांताधिकारी कार्यालय या मार्गावर अनेक ध्वनिक्षेपक बसवण्यात आले होते. त्याच्या साहाय्याने सातत्याने सूचना दिल्या जात होत्या. मोर्चातील काही महिलांना उन्हाचा त्रास झाल्याने चक्कर आली. त्यामुळे त्यांना रूग्णवाहिकेतून नेण्यात आले. इतका मोठा समुदाय असतानाही रूग्णवाहिकेला लगेचच वाट करून देण्यात आली.
चिपळुणात मराठा क्रांती
By admin | Updated: October 17, 2016 00:06 IST