रत्नागिरी : उष्मा वाढल्यामुळे आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. त्यामुळे साहजिकच बाजारातील आंब्याची आवक वाढली आहे. वाशी (नवी मुंबई) बाजारपेठेत मंगळवारी ८६ हजार आंबा पेट्या विक्रीसाठी दाखल झाल्या. मात्र आवक वाढल्यामुळे दरात घसरण झाली आहे. मुंबईत २०० ते ५०० रुपये डझन दराने विक्री सुरू आहे. त्या तुलनेत रत्नागिरीत मात्र आंबा महाग असून, ३५० ते १००० रुपये डझन दराने विक्री सुरू आहे.या वर्षी आंबा उत्पादन एकूणच कमी आहे. मार्चपासून आवक सुरू झाली. मात्र त्याचे प्रमाण कमी होते. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडल्यानंतर उष्मा कमालीचा वाढला आहे. त्यामुळे आंबा लवकर तयार होत आहे. काही ठिकाणी झाडावरच आंबा पिकू लागला आहे. तयार आंबा बागायतदार विक्रीसाठी पाठवत आहेत. मुंबईतील आवक वाढल्याने लगेचच त्याचा परिणाम दरावर झाला आहे. त्यामुळे मुंबईखेरीज पुणे, अहमदाबाद, राजकोट, सांगली, कोल्हापूर बाजारपेठेत विक्रीसाठी आंबा पाठविला जात आहे.
गतवर्षीपेक्षा आंबा कमी, तरी दरही पडलेलागतवर्षी याच हंगामात मुंबई बाजारपेठेत एक ते सव्वा लाख आंबा पेटी विक्री होती. यंदापेक्षा आंबा अधिक होता. त्यावेळीही पेटीचा दर एक हजार ते २५०० रुपये (प्रतिडझन २०० ते ५००) असाच होता. या वर्षी आंबा उत्पादन कमी असतानाही दर कमी आहेत. खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात पाठवेपर्यंत येणारा खर्चही वसूल होत नसल्यामुळे बागायतदारांमध्ये नाराजी आहे.
रत्नागिरीत आंबा महागरत्नागिरी बाजारपेठेत हापूस, पायरी, रायवळ आंबा विक्रीला आहे. हापूस ३५० रुपयांपासून एक हजार रुपये डझन दराने विकण्यात येत आहे. पायरी आंबा ५०० ते १००० रुपये डझन, तर रायवळ २५० ते ३०० रुपये डझन दराने विकण्यात येत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत ५० ते १०० रुपयांनी दर जास्त असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
अन्य राज्यातील आंबावाशी (नवी मुंबई) बाजारपेठेत कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा येथील हापूस, बदामी, लालबाग, बैगनपल्ली आंबा विक्रीला उपलब्ध आहे. ५० ते ९० रुपये किलो तो विकला जातो. मंगळवारी वाशी बाजारात ३६ हजार हापूस पेट्या विक्रीला होत्या. अन्य राज्यांतील आंबा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहे.
रत्नागिरीतील दरामुळे सर्वसामान्यांसाठी तरी सध्या आंबा महागच आहे. दर आवाक्यात येण्यासाठी अद्याप किमान एक-दोन आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. - संकेत कदम