मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील निवे आश्रमशाळेतील आठ विद्यार्थ्यांना हिवतापाची बाधा झाली आहे. या विद्यार्थ्यांना देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती उत्तम असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.देवरुख - रत्नागिरी मार्गावरील निवे बुद्रुक येथील आश्रमशाळेत १००पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हा भाग धामापूर तर्फे देवरुख या आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येतो. याठिकाणी अधिकाऱ्यांची कमतरता आहे. एकच अधिकारी कार्यरत असल्याने त्यांना शाळा तपासणी करणे शक्य होत नाही याचा फटका या विद्यार्थ्यांना बसला आहे.येथील विद्यार्थ्यांना दोन दिवस ताप, सर्दी, खोकला याचा त्रास सुरु होता. सोमवारी संध्याकाळी या मुलांना अधिक त्रास जाणवू लागल्याने येथील शिक्षकांनी ३७ जणांना १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेने देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यानंतर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली. यामध्ये सर्वांना ताप येत असल्याचे सिध्द झाले. यामधील ८ मुलांना हिवताप असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. उर्वरित २९ जणांना औषधे देऊन पाठवण्यात आले. घटनेची माहिती समजताच आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये, आरोग्य सभापती शिवगण यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट दिली.या आठ जणांमध्ये उत्तम शिंंदे, शंकर कोळेकर, विलास झोरे, गणेश झोरे, निलीमा झोरे, सुनील झोरे, वंदना शेळके, शीतल शेळके या विद्यार्थ्यांचा समावेश आहे . तालुका वैद्यकीय अधिकारी रायभोळे आणि रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी संदीप माने या सर्वांवर देखरेख ठेऊन आहेत. (वार्ताहर)
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना हिवतापाची बाधा
By admin | Updated: October 28, 2015 00:01 IST