रत्नागिरी : दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत आहे. साेमवारी ३२ अंश सेल्सिअस इतके तापमान हाेते तर आर्द्रता ६८ टक्क्यापर्यंत हाेती. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. उकाड्याचा हा दाह साेसवत नसतानाच सोमवारी महावितरणने देखभाल दुरुस्तीसाठी शहरी व ग्रामीण भागातील वीजपुरवठा बंद ठेवल्याने उकाड्याचा दाह अधिक जाणवला. शहरी भागात ५ तासाने तर ग्रामीण भागातील तब्बल ९ तासांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.महावितरणने मान्सूनपूर्व तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडाच्या फांद्या, माडाच्या झावळा तोडण्यात येत आहेत. तसेच दोन खांबावरील विजेच्या वाहिन्या घट्ट केल्या जात आहेत, तारेला गार्डनिंग, डीपी दुरुस्तीसह ऑइल बदलण्यात येत आहे. ही सर्व कामे सोमवारीच केली जात असल्याने वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.उन्हाळ्यामुळे पंखे, वातानुकूलित यंत्रणा यांचा वापर वाढला आहे. त्यामुळे विजेची मागणीही वाढली आहे. त्यातच शीतपेयांचाही वापर वाढल्याने नागरिकांसाठी वीज आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांत सकाळच्या वेळेत अधूनमधून वीज गायब हाेण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच साेमवारी देखभाल दुरुस्तीसाठी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान वीज पुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर काही भागात दुपारी तर काही भागात सायंकाळी वीज पुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, ५ ते ९ तास वीज पुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांना घरात राहणे असह्य झाले हाेते.दुपारपर्यंत वीजपुरवठा नसल्यामुळे काही कार्यालयातून जनरेटर सुरू करण्यात आले होते. मात्र, ही सुविधा नसलेल्या कार्यालयात कर्मचाऱ्यांचे हाल झाले. विजेअभावी संगणक बंद होते. काही ठिकाणी सर्व्हरही बंद असल्यामुळे शासकीय तसेच बँका व खासगी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते.
पावसाळ्याची तयारी, नागरिकांना फटकाशहरातील विविध प्रभागांत, तसेच ग्रामीण भागात महावितरणचे कर्मचारी काम करत होते. पावसाळ्याची तयारी सुरू असली तरी याचा वीज पुरवठा खंडित ठेवल्याने नागरिकांना त्याचा फटका बसला.