चिपळूण : सराफ व्यावसायिकांना साधारणतः जानेवारी ते मे हा कालावधी उत्सव आणि लग्नसराईचा असल्याने व्यवसायाची बऱ्यापैकी उलाढाल होते. मात्र, मागील वर्ष लॉकडाऊनमध्ये गेल्याने आधीच अडचणीत असणारा सराफा व्यावसायिक आताच्या लॉकडाऊनमुळे अधिक नुकसानात चालला आहे. नियमांच्या अधीन राहून सराफा व्यवसायास परवानगी द्यावी, अशी मागणी तालुका सुवर्णकार संघाने केली आहे.
पाडव्याच्याच मुहूर्तावर चिपळूण शहरात मोठी उलाढाल होते. अशा मुहूर्तावर होणाऱ्या व्यवसायावर या व्यावसायिकांचा वर्षाचा व्यवहार अवलंबून असतो. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने जारी केलेल्या नियमावलीमुळे हा व्यवसाय बंद असल्याने सराफ व्यावसायिकांसह व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. सोन्याच्या वाढत जाणाऱ्या दरामुळे स्टॉकवरील कराची रक्कमही वाढत आहे, ती भरणेही अडचणीचे होत चालले आहे. कामगारांनाही सांभाळणे यामुळे जिकरीचे झाले आहे. लॉकडाऊनमधून सवलत द्यावी व सराफ व्यवसायाला आधार द्यावा, अशी मागणी चिपळूण तालुका सुवर्णकार संघ अध्यक्ष सुनील सागवेकर व
सदस्यांनी केली आहे.