रत्नागिरी : समाजातील प्रत्येक वर्गाच्या लोकांना राष्ट्रासाठी आणि मानवी विकासासाठी त्यांच्या हक्कांबद्दल माहिती असणे महत्त्वाचे आहे. या ज्ञानासाठीच शिक्षण दिले जाते. लोकांना शिक्षणाकडे प्रेरित करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. या उद्देशाने अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालयाने चालू वर्षी साक्षरता दिनापासून आठवडाभरात राज्यात विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार साक्षरता दिन साजरा करण्याची घोषणा २६ ऑक्टोबर १९६६ रोजी करण्यात आली होती; परंतु त्याची कल्पना सर्वप्रथम इराणच्या तेहरान येथे झालेल्या शिक्षण मंत्र्यांच्या जागतिक परिषदेच्या वेळी आली. ही परिषद १९६५ साली आयोजित करण्यात आली होती, ज्यात निरक्षरता संपवण्यासाठी जगभरात जागरूकता मोहीम चालवण्यावर चर्चा झाली. त्यानुसार जगातील सर्व देशांमध्ये समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने या दिवसाची सुरुवात झाली. समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने जागतिक साक्षरता दिवस भारतातही साजरा केला जातो. भारताचे सर्व शिक्षा अभियान हे या दिशेने कौतुकास्पद पाऊल आहे.
दरवर्षी साक्षरता दिनानिमित्त एक विशेष थीम असते. जगभरात मागील वर्षीपासून कोरोना असल्याने, यावेळी कोरोनासंदर्भातच २०२१ ची आंतरराष्ट्रीय जागतिक साक्षरता दिवसाची थीम ही ‘मानवी-केंद्रित पुनर्प्राप्तीसाठी साक्षरता: डिजिटल विभाजन संकुचित करणे ( ‘Literacy for a human-centred recovery: Narrowing the digital divide) ही आहे. भारत किंवा जगातील दारिद्र्य निर्मूलन करणे, बालमृत्यू कमी करणे, लोकसंख्या वाढ नियंत्रित करणे, लिंग समानता साध्य करणे इत्यादी वाढणे खूप महत्त्वाचे आहे. निरंतर शिक्षण प्राप्त करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि कुटुंब, समाज आणि देशाप्रती त्यांची जबाबदारी समजून घेण्यासाठी साक्षरता दिवस साजरा केला जातो.
साक्षरता दिनापासून आठवडाभरात विविध उपक्रम राबविण्याबाबत अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी चालू वर्षी साक्षरता दिनापासून आठवडाभरात निबंध, वक्तृत्व, घोषवाक्य, चित्रकला, रांगोळी, भित्तीपत्रक स्पर्धा ऑनलाइन घेण्याबाबत सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी यांना सुचित केले आहे. त्यानुसार त्यासंबंधी कार्यवाही सुरू झाली आहे.
.............
कोटसाठी
आंतरराष्ट्रीय समुदायासाठी प्रौढ शिक्षण आणि साक्षरतेच्या दराकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस खास साजरा केला जातो. साक्षरता हा मानवी हक्क आहे. हे केवळ वैयक्तिक सक्षमीकरणाचे साधन नाही तर मानवी आणि सामाजिक विकासाचे एक प्रमुख साधन आहे. दारिद्र्य निर्मूलन, लोकसंख्या वाढ थांबवणे, बालमृत्यू कमी करणे, लैंगिक समानता प्राप्त करणे तसेच विकास, शांतता आणि लोकशाही राखण्यासाठी साक्षरता महत्त्वाची भूमिका बजावते.
-राजेश क्षीरसागर, उपसंचालक, अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य.
..............
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (NSO) आकडेवारीवर आधारित अहवालानुसार, भारतातील साक्षरता दर ७७.७ टक्के आहे. ग्रामीण भागातील साक्षरता दर ७३.५ टक्के आहे तर शहरी भागातील ८७.७ टक्के आहे. भारताचा साक्षरता दर जागतिक साक्षरतेच्या दरापेक्षा कमी आहे. २०११ मध्ये भारताचा एकूण साक्षरता दर ७४.४ टक्के होता. १९४७ मध्ये केवळ १८ टक्के होता. त्याच वेळी, केरळ देशातील सर्वाधिक साक्षरतेचे राज्य असून, तेथे ९३ टक्के लोकसंख्या साक्षर आहे. सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य बिहार असून, तिथे ६३.८२ टक्के लोकसंख्या साक्षर आहे. उत्तर प्रदेश कमी साक्षर असलेल्या पाच राज्यांच्या श्रेणीत आहे. गेल्यावर्षी नवसाक्षर भारत योजना राबवण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती; परंतु कोरोनामुळे ही योजना अद्यापही सुरू झालेली नाही.