।। जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जाे आपुलें ।।
।। ताे ची साधू ओळखावा, देव देथे ची जाणावा ।।
एवढे अमूल्य बाेल तूच तर स्मरणी आणलेस माझ्या. तूच तर शिकवलेस आम्हा.. देव देवळात शाेधण्यापेक्षा जाे गरिबाला मदत करताे आपलं मानून जाे सेवा करताे, त्यात देव शाेधताे तो खरा देव. ज्ञानाच्या आणि मदतीच्या दृष्टीने पाहा जिथे पाहशील तिथे मी दिसेन. खरे आहे हाे तुझे वारीचे, वारीने तुझ्या भेटीस पंढरपूरला यावे, असा आदेश मुळी कधी नव्हताच हाे तुझा. आमचा उगाच प्रेमळ हट्ट ताे बाकी काही नाही. तर काय सांगत हाेताे... हां तुझी भेट. पाहिलेस ना हे यंदाचे वर्ष कसे गेले? सारे ठप्प झाले हाे जिथल्या तिथे, मंदिरेपण बंद हाेती. तुझे सदन ओस बरे दिसत नव्हते. पण, चालायचेच. नियतीसमाेर आपण काेण हाे माेठे.
तुझीच परीक्षा असे समजून प्रयत्न करताेय हाे त्यात पास हाेण्याचा. या काेराेनात सारे घरी हाेते. काय काय तर विसरलेही हाेते तुझ्या नामाला. घरी राहून तेवढेच तुझे नाम त्यांच्या मुखातून निघाले ते एक बरे झाले. तुझीच लेकरं सारी. भरकटतात पण तूच मायबाप ना. वाट चुकलेलं वासरू पुन्हा आणलस हाे कळपापाशी.
या साऱ्यात तुझे काैतुक करायचे राहून गेले. आता म्हणशील काैतुक कसले? लपवण्याचा प्रयत्नपण नकाे हाे करू. सारे ठाऊक आहे मला. माझीच काय माझ्यासारख्या असंख्य माझ्या बंधू-भगिनींची वारी चुकली यंदा. तुझी भेट काय झाली नाही, पण तुझी कमाल हाे. तू मात्र आलास आमच्या भेटीस. माझ्या कठीण प्रसंगी पण उभा राहिलास. देवयुगात अनेक रूपांनी फिरलास ऐकले हाेते हाे. या कलियुगातपण अनेक रूपांनी दर्शन दिलेस. धन्य झालाे. असंख्य तुझी नामे परी तू एकच, असंख्य तुझी रूपे परी तू एकच.. हे ध्यानात आले. कधी डाॅक्टर झालास आणि अनेकांना बरे केलेस. काही दगावले पण त्याचे प्रारब्ध. त्याला तू तरी काय करणार, नाही का? खूप काळजी घेतलीस हाे, २४-२४ तास काम केलेस. हे तर तुझे पहिले रूप झाले. दुसरे पाेलिसांच्या वेषातपण पाहिले हाे तुला. ऊन नाही, तहान नाही, किती रे ते जीवाचे हाल. त्या वेळी विटेवर उभा राहिलास आणि या वेळी रस्त्यावर पाहून डाेळे तृप्त झाले हाे. येणार हाेताे, तुझी गळाभेट घ्यायला; पण तुझ्या चरणातच स्वर्ग रे आमचा. तुला नतमस्तक झालाे. बस्स मग हीच आमची पंढरी आणि हाच आमचा पांडुरंग. भुकेल्याला अन्न पुरवलंस. आराेग्याची काळजी घ्यावी म्हणून अगदी साफसफाई कामगारांच्या रूपात पण आलास हाे.. सारं पाहून नम्र झालाे.
अनेकांनी प्रश्न उभे केले, आता कुठे गेला तुमचा देव? पण, भाबडी माणसं हाेती. त्या साेप्या रूपांत येऊन आम्हाला तारणारा तू त्यांच्या काही दृष्टीस पडला नाहीस. मान्य आहे माणसांनी केले हो सारे काेविडयाेद्धे म्हणून लढले.. पण, हिंमत आणि प्रेरणा तर तूच दिलीस ना. तूच शिकवलंस ना.. ‘जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ म्हणूनच घडले हाे त्यांच्या हातून हे कार्य. एकच मागणं मागताे बघ तुझ्याकडे सर्वांना सुखी ठेव हाे. काळजी घे तुझ्या लेकरांची आणि असाच ये हाे भेटीला या वारकऱ्यांच्या... जमलं तर हे संकट आता थांबव. पुन्हा भजनाच्या, अभंगाच्या रंगात रंगून वारी पूर्ण करायची आहे. इच्छा आहे मनाची तेवढी. अखेरीला जे म्हणणे झाले. बाकी समाप्ती करताे हाे इथेच.
जय जय पांडुरंग हरी
तुझा वारकरी
- जुहिका शेट्ये, वाकेड, लांजा