रत्नागिरी : महाराष्ट्र दोन नेव्हल एनसीसी रत्नागिरी विभागातर्फे ‘कोकण सारथी’ सागरी नौका भ्रमण मोहिमेचा शुभारंभ आज, मंगळवारी भगवती बंदर येथून झाला. महाराष्ट्र राज्य एन.सी.सी.चे संचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी यांनी सागरी मोहिमेला झेंडा दाखविला व सहभागी सर्व छात्रांना मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या. मोहिमेत रत्नागिरी, कोल्हापूर, सावंतवाडी, मुंबई, पुणे, नागपूर येथील नौसेना, स्थलसेना, वायूसेना मधील ६० छात्र सहभागी झाले आहेत.आज, मंगळवारी (दि.१५) मोहिमेचा शुभारंभ झाला असून २४ नोव्हेंबर रोजी सांगता होणार आहे. या मोहिमेतंर्गत ‘प्लास्टिक मुक्त’ समुद्र किनाऱ्यांबाबत पथनाट्याव्दारे संदेश देण्यात येणार आहे. या सागरी नौका भ्रमण मोहिमेत एन.सी.सी अधिकारी, २५ मुली व ३५ मुलगे मिळून एकूण ६० छात्र सहभागी झाले आहेत. नौका भ्रमण मोहिमेत २७ फूट सेलिंग व्हेलर तीन बोटी, शिडाच्या नौका, व छात्र सैनिकांच्या सुरक्षततेच्या दृष्टीकोनातून एक मोठी मच्छिमार नौका व दोन मध्यम यांत्रिक बोट सहभागी झाली आहे. सागरी नौका भ्रमण मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमात मुंबईचे संचालक ब्रिगेडियर सुबोजित लहीरी, ब्रिगेडीयर समीर साळुंखे, कमांडिंग ऑफीसर के. राजेश कुमार उपस्थित होते.सकाळी भगवती बंदर येथून निघालेली सागरी नौका भ्रमण मोहिमेचा प्रवास वरवडे पर्यंत होणार आहे. त्यानंतर वरवडे ते जयगड, जयगड ते तवसाळ व परत, जयगड ते बोऱ्या व परत, जयगड ते दाभोळ, दाभोळ ते धोपावे व परत, दाभोळ ते अंजनवेल-वेलदूर व परत, दाभोळ ते जयगड, जयगड ते काळबादेवी, काळबादेवी ते रत्नागिरीत मोहिमेची सांगता होणार आहे.या मोहिमेतंर्गत छात्र सैनिक बंदरांना भेटी देत असताना, सागराच्या पाण्याशी झुंज देत, लाटांचा सामना करीत दर्यावर्दी जीवनाचा अनुभव घेतानाच बंदरानजीक लोकवस्तीत पथनाट्याच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्ती व समुद्र किनारे स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. छात्र सैनिकांना पाण्यातील साहसी व धाडसीवृत्तीला चालना देणे त्यासाठी विश्वास, शक्ती, मानसिकवृत्ती बळकट करणे, दर्यावर्दी जीवनाचा अनुभव प्राप्त करणे हा या मोहिमेमागचा उद्देश्य आहे.शिडाच्या बोटीतील केवळ कॅनव्हासच्या शिडाच्या (सेल) माध्यमातून १७७ नॉटिकल मैल व ३३२ किलोमीटर प्रवास केला जाणार आहे. या बोटीला कोणतेही यांत्रीक साधन नसताना केवळ शिडाच्या माध्यमातून भरती, ओहोटी वाऱ्याचा वेग व पाण्याचा प्रवाह याचा अभ्यास करून बोटीच्या माध्यमातून पाण्यावरील धाडसी साहस छात्र सैनिक करून दाखवणार असल्याने मोहिमेचे सर्वांनाच कौतुक आहे.
‘कोकण सारथी’ सागरी नौका भ्रमण मोहिमेचा शुभारंभ, ‘प्लास्टिक मुक्तीचा’ संदेश देण्यात येणार
By मेहरून नाकाडे | Updated: November 15, 2022 18:32 IST