अडरे : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातही लसीकरण करण्याचा निर्णय तालुका आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यानुसार तालुक्यातील आरोग्यवर्धिनी प्राथमिक आराेग्य केंद्र वावे, अंतर्गत उपकेंद्र काडवली येथे कोविड लसीकरणाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य अरविंद चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सदस्य कृष्णा लांबे, काडवलीच्या सरपंच भक्ती महाडिक उपस्थित होत्या. तसेच माजी उपसरपंच राकेश महाडिक, उपसरपंच जगदीश महाडिक, ग्रामपंचायत सदस्य काजवे उपस्थित होते. या मोहिमेत पंचायत समिती सदस्य कृष्णा लांबे यांनीही लस घेतली. तसेच प्राथमिक आराेग्य केंद्र वावेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमित भिसे ही उपस्थित होते. लसीकरणासाठी काडवली ग्रामपंचायत व उपकेंद्र काडवली प्रशासनाने उत्तम नियोजन केले होेते. पहिल्याच दिवशी ६० लोकांनी कोविड लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला.
या कार्यक्रमासाठी काडवलीचे ग्रामसेवक जाधव, प्राथमिक आराेग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक पी.डी. झेपले, आरोग्य सेविका मंगल पराडके, आशा स्वयंसेविका श्रद्धा महाडिक, मदतनीस सविता महाडिक, तसेच उपकेंद्राचे डॉ. महेश म्हस्के, गोवर्धन महाडिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्यसेवक गोवर्धन महाडिक यांनी केले.
चौकट
ग्रामस्थांनी लसीकरणचा लाभ घ्यावा
शासनाकडून देण्यात येणारी लस पूर्णत: सुरक्षित आहे. मी स्वत: लस घेतली असून, मला कोणताही त्रास झालेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी या लसीबाबत मनात कोणतीच भीती न बाळगता, शंका उपस्थित न करता लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.