लांजा :
तालुक्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने घट होत असल्याने तालुक्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. शनिवारी केवळ दोन गावांमध्ये चार कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, तर एकाचा कोरोनाने बळी घेतला आहे.
शुक्रवारी तालुक्यात ४० कोरोनाचे रुग्ण आढळले होते, तर शनिवारी केवळ ४ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
तालुक्यात शनिवारी पूनस कडूवाडी येथील ३ जणांचे आरटीपीसीआरचे अहवाल पाॅझिटिव्ह, तसेच आंजणारी मुस्लिमवाडी येथील करण्यात आलेल्या अँटिजन कोरोना चाचणीत एकाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. आंजणारी गावामध्ये कोरोनाचे सध्या संक्रमण थांबले असताना पुन्हा कोरोनाचा रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.
सध्या तालुक्यातील कोरोनाची एकूण रुग्ण संख्या १९५३ झाली आहे. कोरोना रुग्ण २ हजाराचा ठप्पा पार करतो की काय, अशी भीती वाटत आहे, तर १५७२ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या तालुक्यात २९५ कोरोनाचे रुग्ण ॲक्टिव्ह आहेत, तर ८६ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.