रत्नागिरी : कोकण रेल्वेने २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३०१ कोटींचा नफा कमावला असून, ४०७७ कोटींची उलाढाल केली आहे. कोकण रेल्वे भविष्यातही आणखी मोठे प्रकल्प हाती घेणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी सोमवारी रत्नागिरी दाैऱ्यावेळी पत्रकारांना दिली.यावेळी त्यांच्यासाेबत कोकण रेल्वेचे मुख्य वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव, प्रधान मुख्य अभियंता नाग दत्त, मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश बापट उपस्थित होते. झा यांनी सांगितले की, कोकण रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले असून, यामुळे डिझेलवरील अवलंबन संपुष्टात आले आहे.परिणामी, डिझेलवर होणाऱ्या खर्चात १९० कोटी रुपयांची बचत झाली. हे विद्युतीकरण पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. वाहतूक आणि स्थापत्य प्रकल्प ही दोन महत्त्वाची क्षेत्रे आहेत, ज्या माध्यमातून कोकण रेल्वेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. त्यामुळे कोकण रेल्वे सध्या नफ्यात असल्याचे ते म्हणाले.
उधमपूर ते श्रीनगर ‘ड्रीम प्रोजेक्ट’उधमपूर ते श्रीनगर हा प्रकल्प कोकण रेल्वेसाठी प्रतिष्ठेचा आहे. या मार्गावर १६ बोगदे आणि २२ पूल कोकण रेल्वेने बांंधले, तसेच सर्वांत मोठा चिनार पूलही बांधला. हे इंजिनिअरिंग क्षेत्रातील एक मोठे यश मानले जात आहे. यातून अनेक प्रकल्प कोकण रेल्वेकडे येत असल्याचे झा म्हणाले. गेल्या सात महिन्यांत कोकण रेल्वेने दोन हजार कोटींचे नवे प्रकल्प हाती घेतले आहेत.
रत्नागिरी-दिवाबाबत चर्चा सुरूरत्नागिरी-दिवा पॅसेंजर गाडी दादरपर्यंत नेण्याची मागणी होत आहे. याबाबत त्यांनी मध्य रेल्वेसोबत चर्चा सुरू असून, लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. तसेच नागपूर-मडगाव स्पेशल ट्रेन नियमित करण्याचा निर्णय विचाराधीन असल्याचेही त्यांनी सांगितले.