पाचल : ग्रामीण भागातील आरोग्याच्या सुविधा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी शासन तत्पर आहे. शासन कितीही घोषणा करीत असले तरी ग्रामीण भागातील रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्र आजही विविध समस्यांनी ग्रासलेली आहेत. डाॅक्टर्स आहेत, तर औषधांचा पुरवठा नाही, औषधे आहेत तर डाॅक्टर आणि कर्मचारी नाहीत, रुग्णालयाला स्वतंत्र इमारत नाही, असे अनेक प्रश्न आज ग्रामीण भागात रुग्णांना सतावत आहेत.
ग्रामीण भागामध्ये असलेल्या करक - कारवली प्राथमिक आरोग्य केंद्राचा यामध्ये समावेश आहे. या प्राथमिक केंद्राला स्वत:ची स्वतंत्र इमारत नसल्याने गेली १५ वर्षे हे प्राथमिक आरोग्य केंद्र एका भाड्याच्या घरात आहे. जनतेच्या आरोग्यासाठी असलेले हे आरोग्य केंद्र स्वमालकीच्या इमारतीविना आहे. याची ना खंत लाेकप्रतिनिधींना ना पुढाऱ्यांना आहे. याचा सर्वाधिक फटका रुग्णांना बसत आहे. रुग्णांना बसण्यासाठी पुरेशी बैठक व्यवस्था नाही. रुग्णांना तपासण्यासाठी स्वतंत्र खोली नाही, स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही, इतकी भयानक परिस्थिती आहे.
हे प्राथमिक आरोग्य केंद्र ओणी - पाचल - अणुस्कुरा मार्गावर कारवली तिठा येथे आहे. हे आरोग्य केंद्र याअगोदर रायपाटण ग्रामीण रुग्णालय येथे होते. त्यानंतर ते करक - कारवली तिठा येथे स्थलांतरीत करण्यात आले. त्यामुळे तळवडे, पाचल, करक, कारवली, येरडव, पांगरी येथील रुग्णांना लाभ झाला आहे. या इमारतीसाठी शासनाने निधीही मंजूर झाला होता. मात्र, इमारत कुठे बांधावी, हा वादाचा मुद्दा ठरला आणि या वादामुळेच आलेला निधी अखेर परत गेला. काही पुढाऱ्यांनी हा विषय अतिशय प्रतिष्ठेचा केला व हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यामुळे आजतागायत इमारत झाली नसल्याने आरोग्य केंद्र आज १५ वर्षे एका भाड्याच्या घरात सुरू आहे.