देवरूख , दि. १६ : संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यानी जवाहर सिंचन योजनेचे काम पूर्ण केले असतानादेखील पंचायत समिती ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागामार्फत शेतकऱ्याना पैसे अदा करण्यात आलेले नाहीत. या शेतकऱ्याना वारंवार कार्यालयाचे दरवाजे ठोकवावे लागत असल्याचे चित्र आहे.
शेतकऱ्याना कृषी क्षेत्राची आवड निर्माण व्हावी, यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जात आहेत. यातीलच एक जवाहर सिंचन योजना आहे. संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्याना जवाहर सिंचन विहिरीची कामे त्वरीत पूर्ण करण्यात यावी, अशा नोटीसा ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग देवरूख यांच्यामार्फत बजावण्यात आल्या. यानुसार संबंधित शेतकऱ्यानी कर्जे काढून तातडीने विहीर बांधून पुर्ण केल्या आहेत.
अनेक महिन्यांचा कालावधी उलटूनही या योजनेचे पैसे शेतकºयांना मिळालेले नाहीत. हे शेतकरी पैशासाठी पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालय देवरूख येथे गेले वर्षभर खेपा मारत आहेत. मात्र अधिकाऱ्याकडून केवळ चालढकल केली जात असल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.
विहिरीच्या बांधकामामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याना त्वरीत पैसे अदा होणे गरजेचे आहे. मात्र शेतकऱ्याना अजूनही वारंवार खेटे घालावे लागत असल्याने शेतकऱ्यामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.