दापोली : काेराेना रुग्णांची हाेणारी अडचण लक्षात घेऊन दापाेली तालुक्यातील जालगाव गावाने काेविड विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे़ जालगाव गावाने उभारलेले हे काेविड विलगीकरण केंद्र जिल्ह्यातील पहिलेच केंद्र ठरले आहे़ कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेला मात्र सामान्य लक्षणे असणारा ग्रामस्थ आता गावातच आपल्या माणसांमध्ये विलगीकरण कक्षात राहणार आहे. त्यामुळे ‘आपला माणूस’ आपल्याच माणसांसोबत लवकर बरा होईल व पुन्हा लवकर आपल्या घरी जाणार आहे.
जिल्हा परिषद जालगाव शाळेत नव्याने उभारण्यात आलेल्या या विलगीकरण कक्षामुळे एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळला तर त्याला आता दवाखान्यात दाखल न करता गावातील विलगीकरण कक्षात ठेवता येणार आहे. दवाखान्यामध्ये एखाद्या सामान्य व्यक्तीला दाखल केले तर त्याचा धीर खचून जातो. हे आता या अलगीकरण कक्षामुळे होणार नाही. शिवाय प्रत्येक घरांमध्ये एकच शौचालय असते व घरातील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती व इतर व्यक्ती त्या शाैचालयाचा व बाथरूमचा वापर करतात.
एका माणसामुळे संपूर्ण घर कोरोनाबाधित होऊ शकते. हे या सेंटरमुळे टळणार आहे. शिवाय या केंद्रामध्ये फक्त गावातीलच व्यक्ती असल्यामुळे त्या एकमेकांच्या ओळखीच्या असणार आहेत. या ओळखीच्या व्यक्तींमुळे व त्यांच्या सहवासात राहिल्याने त्या पॉझिटिव्ह रुग्णाला आपण दुसरीकडे कुठेही नसून गावातच राहिल्याची हमी मिळणार आहे. यामुळे रुग्ण बरा होण्याचा कालावधी नक्कीच कमी होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
या कोविड विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनावेळी दापोली पोलीस स्थानकाच्या सहायक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ, जालगावच्या सरपंच श्रुती गोलांबडे, उपसरपंच विकास लिंगावळे, जालगावचे अध्यक्ष अशोक जालगावकर, पोलीस कर्मचारी मीलन देशमुख, राहुल सोलंकर, पंचायत समिती सदस्य मनोज भांबिड, विनोद आवळे, मिलिंद शेठ, श्रीराम इदाते, अमित आलम, अनिता जंगम, राजू चोरगे, उपाध्यक्ष रमेश कडू, संपदा पारकर, बबन भुवड यांच्यासह ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.