लोकमत न्यूज नेटवर्क
गुहागर : तालुक्यातील धोपावे येथे सापडलेल्या नवजात बालक प्रकरणाचा तातडीने तपास करा, अशी मागणी गुहागर तालुका भाजप महिला मोर्चातर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन गुहागर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.
धोपावे तरीबंदर येथे १४ ऑगस्ट रोजी रात्री फेरीबोट तिकीट घराच्या पाठीमागे खाजण भागात नवजात अर्भक सापडले होते. या बालकाला योग्य उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले हाेते. प्रसुती कालावधी होण्याआधीच बालक जन्माला आल्याने योग्य उपचार होऊनही बाळाचा मृत्यू झाला. असे असले तरी जन्मताच बाळाला बेवारस सोडून देणे, ही बाब अतिशय चिंताजनक व माणुसकीला काळिमा फासणारे आहे. याचा शोध घेऊन तिला असे कृत्य करण्यासाठी भाग पाडणाऱ्या नराधमांना कठोर कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी गुहागर तालुका भाजप महिला माेर्चातर्फे करण्यात आली आहे. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेचा गांभीर्याने विचार करून समाजातील प्रभावी आणि जबाबदार नागरिकांनीही या घटनेच्या तपासात पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन भाजप महिला मोर्चाच्या गुहागर तालुकाध्यक्ष श्रद्धा खाडे यांनी केले आहे. यावेळी नगरसेविका मृणाल गोयथळे, अमृता जोशी, स्नेहा बारटक्के उपस्थित होत्या.