दापोली : ताैक्ते चक्रीवादळानंतर झालेल्या पावसामुळे काही दिवस थंडावा जाणवत असतानाच, शनिवारपासून पुन्हा उष्णतेत वाढ झाली आहे. यामुळे नागरिक पुन्हा हैराण झाले आहेत. मात्र, याचा फायदा शेतीच्या कामांना होणार असल्याचे जाणकार व्यक्तींकडून सांगण्यात येत आहे.
दापोलीचे कमाल तापमान ३२.१ तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस इतका नोंदविण्यात आले आहे. वादळ झाल्यामुळे शेतीच्या भाजणीत अडचण आली होती. मात्र, गेले दोन दिवस उष्णता वाढल्याने, जमिनीची भाजणी करण्यासाठी पोषकता निर्माण झाली आहे. या उष्णतेला नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत. शहरात थंडपेयाची दुकाने बंद असल्यामुळे नागरिक घरच्या घरीच लिंबू सरबत, कोकब सरबत अशी पेये बनवत आहेत, तर पंखा, एसीचा वापर अधिक केला जात आहे. त्यामुळे अनेक नागरिक पावसाची वाट पाहत आहेत. सध्या शेतकऱ्यांनी शेतीची भाजावळ केली आहे, तरी गावोगाव कोविड रुग्ण सापडल्याने शेतकऱ्यांनी ही शेतीची कामेही थांबविली होती, तर काही शेतकऱ्यांच्या शेतीची अद्याप भाजावळ झालेली नाही. मात्र, त्यात पाऊसही पडल्याने जमिनी ओल्या झाल्या, परंतु पुन्हा उन्हाचा कडाका वाढला असल्यामुळे शेतकरी भाजावळीच्या नियोजनाला लागले आहेत.