चिपळूण : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयातून ७ लाख २ हजार ५४८ रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली आहे. ही घटना काल, गुरुवारी सायंकाळपासून आज, शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता दरम्यान घडली आहे.परशुराम एज्युकेशन सोसायटीचे कार्यालय काल, सायंकाळी बंद करून शिपाई घरी गेले होते. आज, सकाळी शिपाई नेहमीप्रमाणे कार्यालय उघडण्यासाठी आला असता त्याला दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. आत प्रवेश केल्यावर तिजोरी फोडलेली आढळल्याने त्याने संस्थाचालकांना बोलावले. तिजोरीतील ७ लाख २ हजार ५४८ रुपयांची चोरी झाल्याची तक्रार संस्थेचे कार्याध्यक्ष सुधाकर वासुदेव भागवत यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.चोरीचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे, उपनिरीक्षक अविनाश मते, हवालदार अमोल यादव, उमेश कांबळे, उमेश भागवत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. येथे श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना बोलविण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांनी सायंकाळी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. रात्रीपर्यंत पोलिसांचे काम सुरू होते. अधिक तपास उपनिरीक्षक मते करीत आहेत. (प्रतिनिधी)युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये गेले अनेक वर्ष एक शिपाई रात्रपाळीला तैनात असतो. याच आवारात संस्थेचे कार्यालय आहे. असे असतानाही चोरी झाली, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. सध्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया झाल्याने संस्थेकडे पैसे जमा झाले होते. त्यावर चोरट्याने डल्ला मारला आहे.
सात लाखांची चोरी चिपळूणमधील घटना :
By admin | Updated: July 25, 2014 23:32 IST