लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : आंबा उत्पादन कमी असतानाही परदेशातून आंब्याला चांगली मागणी होत असताना कोरोनामुळे दि. ३० एप्रिलपर्यंत विमान वाहतूक सेवा बंद करण्यात आली असल्याने निर्यातीलाही ब्रेक लागले आहेत. मात्र दिल्लीतून आंब्याला चांगली मागणी होत आहे. नुकताच १८०० डझन आंबा दिल्लीत पाठविण्यात आला आहे. आतापर्यंत रत्नागिरीतून दिल्लीमध्ये सात हजार दोनशे डझन आंबा पाठविण्यात आला आहे.
आंबा उत्पादन कमी असल्याने निर्यातीवर परिणाम झाला असतानाच आता विमानसेवा बंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडील दुसऱ्या टप्प्यातील आंबा सुरू झाला आहे. परदेशांतून मागणी चांगली होती. आतापर्यंत कॅनडासाठी ४५० डझन, लंडनसाठी ७८८ डझन, तर कतारसाठी ४२६ डझन आंबा निर्यात झाला आहे. दिल्लीसाठी एकूण सात हजार २०० डझन आंबा पाठविण्यात आला आहे.
पणन विभागाच्या माध्यमातून सद्गुरू एंटरप्रायझेसतर्फे शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यात येऊन रत्नागिरीतून थेट निर्यात करण्यात येत होती. त्यासाठी चांगला प्रतिसाद लाभत होता; मात्र कोरोनामुळे परदेशातील विमानसेवा दि. ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे थेट निर्यात बंद ठेवण्यात आली आहे.
....................
अपेडाच्या मान्यतेने सद्गुरू एंटरप्रायझेसतर्फे येथील शेतकऱ्यांना जाग्यावरच चांगला दर प्राप्त व्हावा, यासाठी जगातील विविध देशांपर्यंत आंबा पोहोचावा, यासाठी थेट निर्यातीवर भर देण्यात आला होता. सध्या विमानसेवेमुळे निर्यात बंद असली तरी दिल्लीसह मुंबई व अन्य राज्यांत आंबा विक्रीसाठी सद्गुरू एंटरप्रायझेसचे प्रयत्न सुरू आहेत.
- प्रांजली प्रशांत नारकर, संचालिका, सद्गुरू एंटरप्रायझेस