रत्नागिरी : हिंदू जनजागृती समितीतर्फे राम नवमी ते हनुमान जयंती या कालावधीत ऑनलाईन बलोपासना सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. युवक, युवतींमध्ये देशाभिमान जागृत व्हावा, श्रीराम आणि हनुमान यांची भक्ती करून स्वतःत भक्तिभाव निर्माण व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात येत आहे.
या उपक्रमाला राष्ट्र धर्मप्रेमी युवांचा वाढता प्रतिसाद लाभत आहे. या बलोपासना वर्गाला खेड, चिपळूण, देवरुख, रत्नागिरी, लांजा, राजापूर अशा विविध ठिकाणांहून ऑनलाईन प्रणालीद्वारे ४५हून अधिक युवक - युवती नियमित जोडले जात आहेत. प्रतिदिन सकाळी ६ ते ७ या वेळेत होणाऱ्या बलोपासना वर्गामध्ये प्रारंभी श्रीरामाचा सामूहिक नामजप घेतला जातो. त्यानंतर शारीरिक व्यायाम प्रकार, श्रीरामाच्या जीवनातील बोधप्रद प्रसंगांचे श्रवण, शारीरिक सराव, हनुमंतांच्या जीवनातील बोधप्रद प्रसंगांचे श्रवण आणि शेवटी हनुमंताचा नामजप अशा क्रमाने वर्ग पूर्ण होतो.
बलोपासना वर्गामुळे एकाग्रता वाढणे, आत्मविश्वास निर्माण होणे, शारीरिक क्षमता विकसित होणे, गुणवृद्धी होणे असे अनेक लाभ होतात. या बलाेपासना सप्ताहात युवक - युवतींनी सहभागी हाेण्याचे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे विनाेद गादीकर यांनी केले आहे.