संदीप बांद्रे/ चिपळूण : कोकणातील सर्वात विस्तीर्ण साडेसात किलोमीटर लांबीचा किनारा, नारळी-पोफळीच्या सदाहरित बागांनी नटलेलं गाव म्हणजे गुहागर. ‘क’ वर्ग पर्यटनाचा दर्जा असलेल्या या तालुक्यासाठी पर्यटन हे ‘लाईफलाईन’ बनले आहे. मात्र, आता कोरोनाच्या परिस्थितीमुळे येथील जीवनमानच ठप्प झाले आहे. पर्यटकच येत नसल्याने सुनेसुने झालेल्या गुहागरमध्ये दीड वर्षात एमटीडीसीच्या माध्यमातून वेळणेश्वर येथील केंद्रात अवघ्या तीन ग्राहकांची नोंद झाली आहे.
निसर्गाने भरभरून दान देऊनही १९९३पर्यंत गुहागरमध्ये पर्यटक फारसे फिरकत नव्हते. व्याडेश्वर आणि दुर्गादेवी ही दोनच देवस्थाने ज्यांची कुलदैवते आहेत, अशीच अनेक मंडळी इथे येत हाेती. १९९३च्या दरम्यान दाभोळ वीज प्रकल्प उभारण्याचा निर्णय झाला. ७० टक्के बहुराष्ट्रीय मालकीच्या या कंपनीच्या उभारणीसाठी देश - विदेशातून सुमारे २ ते अडीच हजार मंडळी इथे काम करत होती. त्यांच्या निवासासाठी अनेकांनी आपल्या घरांमध्ये थोडे बदल करून खोल्या भाड्याने दिल्या. काहींनी लॉज बांधून कंपनीला भाडेतत्वावर दिले. काहींनी हॉटेल व्यवसाय सुरू केला. यातून गुहागरचे रुपडेच बदलून गेले. आता संपूर्ण गुहागर तालुक्याचे जीवनमान केवळ पर्यटनावर आधारित आहे.
मुंबई-गोवा महामार्गापासून गुहागर ४५ किलोमीटर अंतरावर आहे. गुहागरचा समुद्रकिनारा कायमच पर्यटकांनी बहरलेला असतो. एमटीडीसीचे वेळणेश्वर येथे केंद्र असून, या केंद्रांतर्गत सहा बंगले उपलब्ध आहेत. याशिवाय न्याहरी-निवास योजनेंतर्गत तालुक्यात सुमारे ७० केंद्र आहेत. त्याशिवाय ११ हॉटेल व शहरातील चार खानावळी आहेत. पर्यटनाशी निगडीत येथील बाजारपेठ व व्यवसाय विकसित झाले आहेत. मात्र, आता कोरोनाच्या परिस्थितीमुळे ही घडी पूर्णतः विस्कळीत झाली आहे.
-------------------------
पर्यटकांच्या खोलीत कामगारांचे वास्तव्य
गुहागर शहरात न्याहरी-निवास योजनेंतर्गत पर्यटकांसाठी ज्यांनी छोट्या-छोट्या खोल्या उभारल्या आहेत, त्यांनी त्या खोल्या आता महिना दोन हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक दराने भाड्याने दिल्या आहेत. तेथे राहणाऱ्या कामगारांना जेवणही पुरवले जात असल्याने तेच एक उत्पन्नाचे साधन बनले आहे. दाभोळ वीज प्रकल्प व गेल कंपनीच्या पाईपलाईनचे काम करणाऱ्या कामगारांचे वास्तव्य या खोल्यांमध्ये सध्या आहे.
-------------------------
नवीन व्यावसायिक कर्जात बुडाले
गेल्या पाच वर्षात तालुक्यात नवीन व्यावसायिकांची मोठी भर पडली आहे. अनेकांनी कर्ज काढून हॉटेल व लॉजिंग विकसित केले आहेत. मात्र, आता कुठे नवीन व्यवसायाला उभारी मिळत होती, अशातच कोरोनाची परिस्थिती निर्माण झाल्याने अनेकजण कर्जात बुडाले आहेत.
--------------------
पर्यटन क्षेत्रात जे-जे लोक हौसेने काम करत होते, त्यांची हौस कोरोनाच्या परिस्थितीमुळे फिटली आहे. आता साफसफाईची इच्छाही राहिलेली नाही. कामगार ठेवणे परवडत नसल्याने सारेच ठप्प झाले आहे. आता पर्यटकांची वाट पाहण्यापेक्षा कायमस्वरूपी कंपनीतील कामगारांना भाड्याने रूम देणे योग्य वाटू लागले आहे.
- विश्वनाथ रहाटे, टुरिझम डेव्हलपमेंट संस्था, गुहागर.