चिपळूणसह गुहागर, दापोलीत चुरस : शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 11:36 PM2019-10-11T23:36:21+5:302019-10-11T23:40:33+5:30

दापोली मतदारसंघात राष्टवादीचे विद्यमान आमदार संजय कदम यांनी आपल्या कामाचा ठसा गेल्या पाच वर्षांच्या काळात मतदारसंघात उमटवला आहे. आता त्यांच्याविरोधात राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा सुपुत्र योगेश कदम रिंगणात आहेत.

 Guhagar with Chiplun will be dappled in Dapoli | चिपळूणसह गुहागर, दापोलीत चुरस : शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच लढत

चिपळूणसह गुहागर, दापोलीत चुरस : शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच लढत

Next
ठळक मुद्देरत्नागिरी भाजपचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर - : प्रसाद लाड यांच्या सूचनेनंतर काही तासांतच गटबाजी लढतींकडे लक्ष नियमाला धरूनच निवड : पटवर्धन

प्रकाश वराडकर ।
रत्नागिरी : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी चिपळूण, गुहागर व दापोली या ३ विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना व राष्टवादी कॉँग्रेस यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे जिल्ह्याबरोबरच राज्याचे या तीनही मतदारसंघातील लढतीकडे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्ह्यातील विधानसभा लढत ही मुख्यत्वे महायुती व आघाडी यांच्यात आहे. मात्र, जिल्ह्यातील दापोली, गुहागर व चिपळूण या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्याची राजकीय स्थिती पाहता होणाऱ्या लढती या लक्षवेधी व चुरशीच्या ठरण्याची शक्यता अधिक आहे.

दापोली मतदारसंघात राष्टवादीचे विद्यमान आमदार संजय कदम यांनी आपल्या कामाचा ठसा गेल्या पाच वर्षांच्या काळात मतदारसंघात उमटवला आहे. आता त्यांच्याविरोधात राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा सुपुत्र योगेश कदम रिंगणात आहेत. त्यामुळे ही लढत ख-या अर्थाने संजय कदम विरोधात रामदास कदम यांच्यात होणार असे राजकीय चित्र आहे. येथून कोणते कदम विजयी होतात, याची सर्वांना उत्कंठा आहे.
चिपळूण मतदारसंघात सेनेचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. तिवरे धरणफुटीनंतर सदानंद चव्हाण हे या धरणाच्या ठेकेदार कंपनीतील संचालक असल्याचे पुढे आले. त्यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी निकृष्ट दर्जाच्या कामाचा आरोप केला होता. परिणामी चव्हाण यांना सेनेकडून पुन्हा उमेदवारी मिळेल का, याबाबत शंका होती. परंतु पक्षाने पुन्हा एकदा चव्हाण यांनाच उमेदवारी देऊन विरोधकांचे तोंड बंद केले आहे. त्यांच्याविरोधात गेल्या चार वर्षांपासून मतदारसंघात विकासकामे करीत जनसंपर्क वाढविणारे राष्टÑवादीचे माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी मोठे आव्हान निर्माण केले आहे. निकम यांची जनमानसातील प्रतिमाही चांगली आहे. या स्थितीत दोन तुल्यबळ उमेदवार आखाड्यात आमने - सामने उभे ठाकले असून, येथे मतदार काय निर्णय देतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

गुहागर हा विधानसभा मतदारसंघ मूळ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, येथे गेल्या दोन कार्यकाळात राष्टवादीतर्फे भास्कर जाधव यांनी विजय मिळविला. यावेळी भास्कर जाधव हे शिवसेनेत परतले आहेत व सेनेतर्फे निवडणूक लढवित आहेत. त्यांनी सेनेत परत येताना राष्टवादीतील कार्यकर्तेही सेनेत आणले आहेत. मात्र, गुहागरमध्ये राष्टवादीची ताकद आहे. सेनेतून राष्टवादीत आलेले सहदेव बेटकर व भास्कर जाधव येथे आमने-सामने आहेत. बेटकर यांना त्यांच्या समाजघटकाचे पाठबळ आहे. तसेच भाजपला हा मतदारसंघ न मिळाल्याने भाजपची नाराजी जाधव विरोधकांना फायदेशीर ठरणार का, याचीही चर्चा आहे.

विद्यमानांना संधी : कॉटे की टक्कर शक्य
जिल्ह्यातील पाचही जागांवर महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामध्ये आमदार उदय सामंत, राजन साळवी, सदानंद चव्हाण व भास्कर जाधव हे चार विद्यमान आमदार पुन्हा भवितव्य आजमावत आहेत. सेनेतर्फे दापोलीत योगेश कदम, महाआघाडीतर्फे राष्टवादीचे विद्यमान आमदार संजय कदम, चिपळूणमधून राष्टवादीचे शेखर निकम, गुहागरमधून राष्टवादीचे सहदेव बेटकर, रत्नागिरीतून राष्टवादीचे सुदेश मयेकर, तर राजापूरमधून कॉँग्रेसचे अविनाश लाड हे रिंगणात आहेत. अन्य पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवारही आखाड्यात उतरले आहेत.

 


रत्नागिरी भाजपचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर - : प्रसाद लाड यांच्या सूचनेनंतर काही तासांतच गटबाजी

रत्नागिरी : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी आमदार बाळ माने व त्यांचे समर्थक तसेच नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन आणि त्यांचे समर्थक यांच्यातील वाद विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये विकोपाला गेले आहेत. रत्नागिरी तालुकाध्यक्षपद व अन्य पदाधिकाऱ्यांची निवड करताना माने गटाला विश्वासात घेतले नाही. यावरून या वादाचा शुक्रवारी उद्रेक झाला. बंदररोड येथील देवर्षी सभागृहात भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा बाळ माने यांच्या उपस्थितीत झाला. त्यामध्ये भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली.
जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी केलेल्या पदाधिकारी नियुक्त्या योग्यच आहेत, असे विधान भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी गुरूवारी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत केले होते. त्यानंतर दुसºयाच दिवशी भाजपमधील अंतर्गत मतभेदांचा स्फोट झाला आहे. भाजपच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या या मेळाव्याला महायुतीचे (शिवसेना) उमेदवार उदय सामंत यांनीही हजेरी लावली. माजी आमदार बाळ माने यांनी सामंत यांचे स्वागत केले. मेळाव्याला शेजारी भाऊ शेट्ये, दीपिका जोशी, नाना शिंदे, सतीश शेवडे, किसन घाणेकर, बडू पाटकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
दिलदार शत्रू बरा : माने
या मेळाव्यात बोलताना बाळ माने म्हणाले, कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. मी व उदय सामंत हे राजकीय प्रतिस्पर्धी होतो. मात्र, महायुतीमुळे आता उदय सामंत यांना आम्ही मोठ्या मनाने स्वीकारल्यामुळे रत्नागिरीचा नक्कीच विकास होईल. खोटेनाटे सांगणाऱ्यांचे बारा वाजतील व त्यांची दुकाने बंद होतील. उद्यापासून दहा दिवस भाजपचे कार्यकर्ते नेटाने प्रचार करणार आहेत, असे बाळ माने यांनी सांगितले.

नियमाला धरूनच निवड : पटवर्धन
रत्नागिरी : पक्षाने माझ्याकडे भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली आहे. या पदाच्या अधिकाराचा वापर पक्षवाढीसाठी मी करणे हे नियमाला धरूनच आहे. तालुकाध्यक्षपदी सुशांत चवंडे यांची केलेली निवड हा पक्षाने दिलेल्या अधिकाराचाच भाग आहे. त्यामुळे पटवर्धन डावलतात, असा आरोप करणे चुकीचे आहे, असे मत भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
माजी आमदार बाळ माने यांच्या उपस्थितीत भाजपमधील त्यांच्या समर्थकांची सभा रत्नागिरीत झाली. त्यामुळे भाजपमध्ये गटबाजी आहे, असे चित्र निर्माण झाले आहे. याबाबत प्रतिक्रिया विचारता पटवर्धन बोलत होते.
त्यांनी सांगितले की, पक्षाच्या सभेसाठी मी राजापूर येथे गेलो होतो. आता परत रत्नागिरीत निघालो आहे. त्यामुळे मला या सभेबाबत पूर्ण माहिती नाही. सभा झाली असेल तर ती माजी आमदार बाळ माने यांची व्यक्तिगत सभा असू शकते. मात्र, ती पक्षाची अधिकृत सभा ठरत नाही. अशा प्रत्येक गोष्टीची दखल जिल्हाध्यक्ष म्हणून मी घ्यायलाच हवी, असे नाही, असेही पटवर्धन यांनी बोलताना स्पष्ट केले.
माने यांनी घेतलेल्या या सभेत जर काही चर्चा, वेगळे विषय झाले असतील, कार्यकर्त्यांचे काही म्हणणे असेल व ते माझ्यापर्यंत योग्य चॅनेलद्वारे आले तर त्याबाबत विचार करून पुढील दिशा ठरविता येईल. कार्यकर्त्यांना त्यांचे विचार मांडण्याचा अधिकार पक्षात आहे, असे पटवर्धन म्हणाले.

Web Title:  Guhagar with Chiplun will be dappled in Dapoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.