असगोली : करोडो रुपये खर्च करुन क्रीडा संकुलाचे बांधकाम सुरु करण्यात आले. तीन वर्षे झाली तरीही हे बांधकाम पूर्ण न झाल्याने शालेय विद्यार्थ्यांना मैदान असूनसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर स्पर्धा खेळाव्या लागत आहेत. त्यामुळे ‘मैदान दारी, मुले धावताहेत रस्त्यावरी’ असाच काहीसा प्रकार गुहागरवासीयांना पाहायला मिळत आहे. गुहागर तालुक्यातील देवघर येथील आदर्श विद्यालयाच्या पटांगणाशेजारी तालुकास्तरीय क्रीडा संकुल तीन वर्षापूर्वी मंजूर झाले. त्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी यासाठी निधी मंजूर करुन हे काम सुरु केले. मात्र, आज तीन वर्षे पूर्ण होत आली, तरीही हे क्रीडा संकुल अद्यापही पूर्ण न झाल्याने ते केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांमधून विचारला जात आहे. नुकत्याच गुहागर तालुकास्तरीय शालेय स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांमधील काही खेळांचे प्रकार हे गुहागर-विजापूर या महामार्गावर घेण्यात आले. त्यामुळे एकीकडे मैदान दारी, शालेय मुले धावताहेत रस्त्यावरी अशीच काहीशी अवस्था पाहावयास मिळाली. लवकरात लवकर अपूर्ण असलेले हे तालुकास्तरीय क्रीडा संकुल पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे. (वार्ताहर)
मैदान दारी, मुले रस्त्यावरी!
By admin | Updated: October 18, 2016 00:39 IST