रत्नागिरी : नुकसानभरपाईऐवजी शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी देण्याची मागणी करण्याचा आणि कृषीपंपांना वीजपुरवठा न देणाऱ्या महावितरणविरोधात ग्राहक मंचाकडे जाण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या सभेला शासनाच्या विविध खात्याचे खातेप्रमुख अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीवरुन सदस्य उदय बने, भगवान घाडगे, राजेश मुकादम, बाळकृष्ण जाधव, सदस्या रचना महाडीक व अन्य सदस्यांनी जोरदार आवाज उठवित त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. याप्रकरणी त्या-त्या खात्याच्या वरिष्ठांकडे त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असे प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी उपाध्यक्ष सतीश शेवडे, सर्व सभापती, सदस्य व अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण भागातून शहरामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही ठिकाणी बसची सोय नसल्याने त्यांची गैरसोय होत असल्याचे सदस्या विनया गावडे यांनी केली होती. मात्र महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी शाळेचे वेळापत्रकच बदलण्याची विनंती शाळा व्यवस्थापनाकडे करुन सर्वांना धक्काच दिला. यावर अध्यक्ष जगदीश राजापकर यांनी एस.टी.च्या अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलाविण्याचा निर्णय जाहीर केला. शेतकऱ्यांना देण्यात आलेले शेकडो कृषीपंप तीन वर्षांपासून वीज जोडणी न दिल्याने नादुरुस्त झाले आहे. याबाबत अनेक सभांमध्ये मागणी करुनही महावितरणने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शासनाचे ६० लाख रुपये फुकट गेले आहेत. याबाबत महावितरणच्या विरोधात कृषी समितीने ग्राहक मंचात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याला या सभेत परवानगी देण्यात आली. बागायतदारांच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे जागेवर जाऊन करण्यात आले का, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केल्यावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न करताच सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. सभागृहाला पंचनामे दाखवा, त्या पंचनाम्यावर त्रिसदस्यीय समितीसह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत का, असा प्रश्न सदस्यांनी विचारताच अधिकारी गोंधळून गेले होते. मागील नुकसान भरपाईचे ४६ कोटी शासनाकडे परत गेले. केवळ सातबारा उताऱ्यावर अनेक शेतकऱ्यांची नावे असल्याने हा प्रकार घडला. या सभेमध्ये बागायतदारांना नुकसान भरपाई नको. मात्र, जो उत्पादक आहे, तसेच कर्ज घेतो त्यालाच शासनाची पीक कर्जमाफी मिळावी, अशी मागणी करतानाच त्यांची नांवे बँकांकडून घ्यावी, असे सुचवण्यात आले. रत्नागिरीच्या गटशिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्या बदलीनंतर त्यांना तत्काळ सोडण्यात आल्याबद्दल सदस्य उदय बने, राजेश मुकादम व अन्य सदस्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली. गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त असताना तसेच सावंत यांची चौकशी सुरु असताना त्यांना सोडलेत कसे, तसेच याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करुन सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. (शहर वार्ताहर) ‘अॅस्टर आधार’वर कारवाईची मागणी जीवनदायी योजनेअंतर्गत हृदय शस्त्रक्रियेसाठी गेलेल्या निवळी येथील रुग्णाला शस्त्रक्रिया बंद झाल्याचे सांगून कोल्हापूर येथील अॅस्टर आधार हॉस्पिटलने २ लाख ५० हजार रुपयांचे अंदाजपत्रक दिले. या प्रकरणी त्या रुग्णालयावर काय कारवाई केली असा प्रश्न बने यांनी उपस्थित केला. तात्काळ कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
महावितरणविरोधात ग्राहक मंचाकडे जाणार
By admin | Updated: June 25, 2015 01:08 IST