लांजा : तालुक्यातील विलवडे येथील पूरग्रस्त पाच कुटुंबांना लांजा तालुका इंदिरा काँग्रेसच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटण्यात आले. मुचकुंदी नदीला आलेल्या महापुरामुळे या कुटुंबांच्या घरात पाणी घुसल्याने अतोनात नुकसान झाले होते. विलवडे गावातील हमीद मालीम, अकबर मालीम, उमर मालीम, शब्बीर मालीम आणि शब्बीर शेख यांच्या घरातील अन्नधान्याचे पुरात नुकसान झाले होते.
मानधनाची प्रतीक्षाच
खेड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भजन, कीर्तन, प्रवचन, पोवाडा आदींच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या कलाकारांना मानधन देण्याची घोषणा केली होती. परंतु, यातील काही कलाकारांच्या नावांची नोंद झालेली नाही. त्यामुळे हे कलाकार मानधनापासून वंचितच आहेत. या कलाकारांना मानधन मिळावे, यासाठी वारकरी साहित्य परिषद, खेड यांच्यावतीने तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांना निवेदन देण्यात आले.
सेना महाराज पुण्यतिथी
दापोली : येथील पेन्शनर हॉल येथे ४ सप्टेंबर रोजी श्री संत सेना महाराज पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने सकाळी १० वाजता श्री संतसेना महाराज प्रतिमा पूजन, आरती असे विविध कार्यक्रम होणार आहेत. तालुक्यातील समाजबांधवांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन शहराध्यक्ष नरेश इंदुलकर व तालुकाध्यक्ष मंगेश शिंदे यांनी केले आहे.
अतिक्रमण वाढले
आवाशी : खेड - भरणे मार्गावर रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या टपऱ्यांमुळे हा मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात अडकत आहे. त्यातच आता रस्त्यालगत बेशिस्तपणे वाहने लावली जात आहेत. दिवस-रात्र उभ्या असलेल्या या वाहनांमुळे वाहतुकीला अडचण होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत
सावर्डे : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या महापुरानंतर शासनाने व्यापाऱ्यांना ५० हजार रुपयांची तातडीची मदत देण्याची घोषणा केली होती. परंतु, आता १ महिना उलटला तरी अजूनही या व्यापाऱ्यांना मदत मिळालेली नाही. महापुरात अपरिमित नुकसान झालेले हे व्यापारी सध्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.