चिपळूण : 'गणपत्ती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या' अशा जयघोषात, भावपूर्ण वातावरणात व साश्रू नयनांनी मंगळवारी पाच दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला. कोविडच्या नियमावलीचे पालन करत, तर काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुका काढत तालुक्यातील १६ हजार ५०० गणरायांचा विसर्जन सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला.
गणेशोत्सव कालावधीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे वेळोवेळी जनजागृती केली जात होती. त्यामुळे यावर्षीही कोरोनाचे सावट होते. नागरिकांनीही गतवर्षीप्रमाणे नियम पाळत हा उत्सव साजरा केला. यानिमित्ताने विसर्जनासाठी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच नगर परिषद कर्मचारी व कामगारांची अतिरिक्त कुमक तैनात केली होती.
विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विसर्जन घाटाच्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच विसर्जन घाटाच्या रस्त्यावर पूर परिस्थितीमुळे आलेला गाळ हटवून साफसफाई मोहीम राबविण्यात आली होती. याशिवाय नगर परिषदेने प्रत्येक ठिकाणी निर्माल्य कलश उभारले होते. विसर्जन सोहळ्यासाठी नेहमी गजबजणारे बाजारपूल, बहाद्दूरशेख नाका येथील वाशिष्ठी पूल, गांधारेश्वर, रामतीर्थ तलाव हा परिसर चकाचक केला होता. त्यामुळे भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसत होता.
शहर व परिसरात मंगळवारी सायंकाळी ४ वाजल्यापासून गणरायाच्या विसर्जन सोहळ्यास सुरुवात झाली. त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत हा सोहळा सुरू होता. यावेळी पाच दिवसांच्या गणरायासोबत सार्वजनिक मंडळांनीही कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत अनंत चतुर्थीपर्यंत न थांबता विसर्जन केले. याशिवाय काहींनी कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जित करून गणेशोत्सवात नवा पायंडा पाडला. विसर्जनावेळी गर्दी टाळण्यासाठी काही मंडळांनी जनजागृतीपर फलक उभारले होते.