लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाजी खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहे. खरेदी-विक्रीसाठी शेतकरी, व्यापाऱ्यांची होणारी गर्दी पाहता, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. शिवाय मास्क तोंडाऐवजी कानाला अडकवून ठेवण्यात येत आहेत. अनेकजण मास्क वापरतच नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रात्रीपासून परजिल्ह्यांतील शेतकरी लिलावासाठी भाजीपाला घेऊन येत असतात. पहाटे साडेचार वाजता व्यापारी खरेदीसाठी आल्यानंतर लिलावाची बोली सुरू होते. साधारणत: दोनशे ते अडीचशे लोकांची गर्दी जमते. लिलाव झाल्यानंतर व्यवहार झाल्यावर भाजीपाला ताब्यात घेऊन व्यापारी, शेतकरी यांची पांगापांग होईपर्यंत सकाळचे नऊ वाजतात. त्या दरम्यान भाजीपाला ताब्यात घेणे, वाहनांत चढविणे या गोष्टी घडत असतात. लिलावासाठी गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे निदर्शनास येते. त्यातच कित्येकांनी मास्क परिधान केलेला नसतो, तर काही ग्राहकांचा मास्क कानाला असतो, तोंडावर नसतो. यामुळे पाच ते साडेपाच तासांच्या अवधीत कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे. यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने धोका वाढला आहे.
एकीकडे शासनाने ‘ब्रेक द चेन’साठी कडक निर्बंध लागू केले आहेत. असे असताना लिलावाचे व्यवहार होताना निर्बंध का लावले जात नाहीत? शहराजवळील नाचणे येथे व्यवहार संपल्यानंतर विक्रेते शहर व आसपासच्या गावात भाजीविक्रीसाठी जात असतात. यामुळे ही मंडळी कित्येक लोकांच्या संपर्कात येत असल्याने संसर्ग फैलावला जात आहे. भाजीपाल्याचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये असल्याने लिलाव प्रक्रिया जरी गरजेची असली तरी कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन होणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीनेही पुढाकार घेणे गरजेचे आहे.