चिपळूण : येथील महसूल विभागाने अनधिकृत गौण खनिज वाहतूकधारकांवर केलेल्या कारवाईपोटी शनिवारपर्यंत ४ डंपरच्या मालकांनी २ लाख ४७ हजार १०० रुपये दंड भरला आहे. मात्र अद्यापही तीन जप्त केलेले डंपर तहसील कार्यालयाच्या आवारात उभे आहेत. डंपरचालक-मालकांनी शुक्रवारी आंदोलन करून डंपर सोडविणार नाही, अशी घोषणा केली होती. ही घोषणा शनिवारी हवेत विरली. उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार वृषाली पाटील व त्यांच्या फिरत्या पथकाने गुरुवारी सायंकाळपासून शुक्रवारदरम्यान प्रशासनाने कारवाया केल्या. त्यानुसार रसूल अली शेख यांच्या डंपर (एम एच ०८ एच ३२८८)मध्ये एक ब्रास माती आढळली असून, त्यांना २५ हजार ४०० रुपये दंड आकारण्यात आला. त्यांनी हा दंड भरला आहे. सखाराम राजाराम नलावडे यांचा डंपर (एम एच ११ एफ ५४३७), दिनेश हरिश्चंद्र घाग यांचा डंपर (एम एच ०४ डी डी ३०४१), मुकुंद धोंडू मोहिते यांचा डंपर (एम एच ०४ सीए ८४५८) या तीन गाड्यांमधून प्रत्येक दोन ब्रास माती पकडण्यात आली. या प्रत्येकाला ५० हजार ८०० रुपये दंड सुनावण्यात आला आहे. या तिघांचाही दंड प्रलंबित आहे. विष्णू रघुनाथ दोडमणी यांच्या डंपर (एम एच ०८ एच ००११)मध्ये दीड ब्रास वाळू आढळली असून, त्यांना ७५ हजार ६०० रुपये दंड आकारण्यात आला. मारुती शंकर राठोड डंपर (एम एच ०८ एच १८२०) मधून दोन ब्रास वाळू पकडण्यात आली असून, १ लाख ८०० रुपये दंड करण्यात आला. समीर रघुनाथ जाधव डंपर (एम एच ०४ डी डी २४९४) मध्ये तीन ब्रास चिरा आढळला असून, त्याला ४५ हजार ३०० रुपये दंड करण्यात आला. या तिघांनीही दंड जमा केला आहे.दरम्यान, पकडण्यात आलेल्या सर्व डंपरमालकांचा मिळून एकूण ३ लाख ९९ हजार ५०० रुपये दंड झाला आहे. त्यापैकी चौघांचा २ लाख ४७ हजार १०० रुपये एवढा दंड प्रशासनाकडे जमा झाला आहे. गौण खनिज वाहतुकीबाबतकठोर कारवाई सुरूच राहणार असून, दंड भरण्यास कोणी टाळाटाळ केली, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे तहसीलदार वृषाली पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
चार डंपरचालकांनी भरला अडीच लाख दंड
By admin | Updated: March 13, 2016 01:16 IST