पावस येथे बुधवारी लसीकरण
रत्नागिरी : तालुक्यातील पावस जिल्हा परिषद गटातील १८ ते २९ वयोगटातील सर्वांसाठी लसीकरण मोहीम २५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. पावस विद्यामंदिर व गावखडी येथे सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत आयोजित करण्यात आले आहे.
सफाई कर्मचाऱ्यांचे रक्षाबंधन
दापोली : श्रीराम महिला मंडळ प्रभूआळी येथील भगिनींनी नगरपंचायत सफाई कर्मचाऱ्यांना राखी बांधून व मिठाई वाटून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा परवीन शेख, नगरसेविका जया साळवी, नम्रता शिगवण उपस्थित होत्या.
एसटी फेऱ्या सुरू
चिपळूण : महापुरामुळे चिपळूण आगाराचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मात्र, संकटावर मात करीत आगारातून ७५ टक्के फेऱ्या सुरू केल्या आहेत. ई - तिकीट मशीन पुरामध्ये वाहून गेल्याने पर्यायी तिकीट ट्रेचा वापर सुरू आहे. शिवाय डिझेल टाकीचे नुकसान झाल्याने दुरुस्तीचे काम सुरू आहे. पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
चॅरिटेबल ट्रस्टची बांधिलकी
गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वरमध्ये ग्रामविकास प्रकल्प उभ्या करणाऱ्या साथ साथ चॅरिटेबल ट्रस्टने रा. स्व. संघ जनकल्याण समितीकडे ५१ हजार रुपयांची देणगी सुपुर्द केली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपलाही खारीचा वाटा असावा, या उद्देशाने ही मदत केल्याचे शरद जोशी यांनी सांगितले.
वक्तृत्व स्पर्धेत यश
रत्नागिरी : तालुक्यातील कुर्धे शाळेत ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पहिली ते चाैथीपर्यंतच्या गटात साईशा नाईक, राहुल मिराशी, अनन्या अभ्यंकर, विघ्नेश नाईक तर पाचवी ते सातवीपर्यंतच्या गटात निषाद मिराशी, श्रावणी पाटील, रिध्दी म्हादये, विवेक नाईक यांनी यश संपादन केले.
पूजा कर्वे विजेती
मंडणगड : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे तालुका मंडणगड शाखेतर्फे तालुकास्तरीय देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत पूजा कर्वे विजेती ठरली, तर दीपांजली धाडवे, युवराज देवघरकर यांनी अनुक्रमे व्दितीय, तृतीय तर दीपक बागुल, श्रध्दा जाधव यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.
क्रिकेट निवड चाचणी
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित १९ वर्षाखालील मुलींची निवड चाचणी दि. २४ ऑगस्ट रोजी होणार आहे. ज्या मुलींचा जन्म दि. १ सप्टेंबर २००२ नंतर झाला असेल त्या मुली या क्रिकेट निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. निवड चाचणीवेळी स्वत:चे कीट, जन्मदाखला, प्रत व रहिवासी दाखला प्रत, फोटो घेऊन उपस्थित रहावे.
रस्ता सुरक्षा गाइडलाइन्स
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदतर्फे शहरातील रस्ता सुरक्षा गाइडलाइन्स बनवली जाणार आहे. त्यासाठी ट्रॅफिक ऑडिट तयार केले जाणार आहे. शहरात वाहनांची संख्या वाढत आहे. मात्र रस्ता सुरक्षा मार्गदर्शक दिशा जुन्याच अवलंबल्या जात आहेत. त्यामध्ये सुधारणा करून वाहतुकीला शिस्त लावण्याची आवश्यकता आहे.
डोंगराला भेगा
रत्नागिरी : तालुक्यातील साठरेबांबर-ठोंबरेवाडी गावातील तीन वाड्यांतील घरानजीक असणाऱ्या डोंगराला भेगा गेल्या असून, जमीन खचण्याची शक्यता व दरड कोसळण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे तेथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.