रत्नागिरी : पर्ससीनवर बंदी असल्यामुळे केवळ पारंपरिक पद्धतीने मासेमारी सुरू आहे. पावसाळ्यातील दोन महिने मासेमारी बंद असते. सध्या अवैध पर्ससीन मासेमारी सुरू असली तरी पारंपरिक पद्धतीने मासेमारी सुरू आहे. मासे कमी उपलब्ध होत असल्याने नौकामालकांनी जाळी वाळविण्याच्या कामाला प्रारंभ केला आहे.
दि. १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदी आदेश असल्याने दोन महिने मासेमारी बंद ठेवण्यात येते. पावसाळ्यात वादळी वारे व उसळणाऱ्या उंच लाटा, शिवाय माशांच्या प्रजननाचा कालावधी असल्याने मासेमारी शासकीय आदेशानुसार सक्तीने बंद ठेवण्यात येते. पावसाळ्यात वादळ, वारे याचा धोका असल्यामुळे नौका किनाऱ्यावर सुरक्षित लावण्यात येतात. गेल्या आठवड्यात चक्रीवादळामुळे नौका किनाऱ्यावर सुरक्षित लावण्यात आल्या होत्या. तेव्हापासून मासेमारी बंदच ठेवण्यात आली आहे.
पावसाळ्यामुळे नौका किनाऱ्यावर सुरक्षित लावण्याचे काम सुरू झाल्याने सध्या किनाऱ्यावर लगबग सुरू झाली आहे. मासेमारी बंदसाठी सुरुवातीला असलेला ९० दिवसांचा कालावधी अधिक असल्यामुळे मच्छिमारी संघटनांकडून ९० दिवसांऐवजी ६० दिवसांच्या मासेमारी बंदीची मागणी करण्यात आल्याने बंदीचे दिवस कमी झाले आहेत. पर्ससीन बंदी अद्याप जारी आहे. शिवाय पावसाळ्यातील मासेमारी बंदीस अवघे आठ दिवस शिल्लक राहिले आहेत.
पारंपरिक पद्धतीने मासेमारी सुरू आहे. मत्स्य उत्पादनात घट झाल्याने आर्थिक उलाढाल ठप्प आहे. बाजारात माशांची आवक मंदावली आहे. मासेमारीसाठी समुद्रात जाणाऱ्या नौकेला लागणारे इंधन, बर्फ, खलाशी पगार, शिवाय अन्य खर्चासाठी येणाऱ्या खर्चाच्या प्रमाणातही मासे मिळत नाहीत. त्यामुळे मच्छिमारांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. काही मच्छिमारांनी नौका किनाऱ्यावर लावण्याबरोबर जाळ्या वाळविण्याचे काम सुरू केले आहे.
जाळ्यांच्या किमती लाखो रुपयांच्या घरात आहेत. समुद्राच्या खाऱ्या पाण्याने जाळी खराब होतात. शिवाय गाळात अडकून जाळी फाटतात. पावसाळ्यातील दोन महिने मासेमारी बंद असल्यामुळे जाळ्या खराब होऊ नयेत यासाठी ती गोड्या पाण्याने स्वच्छ धुऊन वाळवून सुरक्षित ठेवण्यात येत आहेत.
खाडी किनाऱ्यावर कालवी व शिंपल्या काढून ते वाळविण्यात येत आहेत. मात्र, कोरोनामुळे नेहमीप्रमाणे होणारी गर्दी थांबली आहे. पावसाळ्यात मासे उपलब्ध होत नसल्यामुळे पर्यायी म्हणून वाळविलेल्या कालवी, शिंपल्याचा आहारात समावेश करीत असल्याने भरती - ओहोटीचा अंदाज घेत शिंपल्या, कालवी काढली जात आहेत.