रत्नागिरी : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करत बसमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केल्याप्रकरणी रत्नागिरी एमआयडीसीतील एका शैक्षणिक संस्थेच्या बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे ही कारवाई करण्यात आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’ हे धोरण राबविले आहे. त्यामुळे विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबतही नियम लागू करण्यात आले आहेत. मात्र, शनिवारी सकाळी ९.२५ वाजेच्या सुमारास मारुती मंदिर येथे टाटा बस (एमएच ०८, एपी ००७७) या गाडीत तब्बल ८० प्रवासी असल्याचे आढळले. या प्रवासी गाडीची क्षमता ६० इतकी असून या गाडीमध्ये बसण्याच्या जागेपेक्षा जास्त म्हणजे २० प्रवासी उभे राहिलेले हाेते. हे सर्व प्रवासी एका शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी असल्याचे पाेलीस तपासात निष्पन्न झाले.
याप्रकरणी पोलीस शिपाई नीलेश धांगडे यांनी शहर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार बसचालक मनेष यशवंत कोकनी (मूळ रा. चिरवे. पो. मोठे कडवण जि. नंदुरबार सध्या रा. फगरवठार पोलीस लाईन नं. ३) याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम २६९ अन्वये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तपास हेड काॅन्स्टेबल लक्ष्मण कोकरे करीत आहेत.