लाेकमत न्यूज नेटवर्क
आरवली : राजकारण बाजूला ठेवून जर समाजासाठी लढा दिला जाणार असेल तर राजकीय वस्त्रे बाजूला ठेवून या लढ्यात बराेबरीने काम केले जाईल. आरक्षणाचा हा लढा राजकारणविरहीत व्हावा व मराठा समाजाला न्याय मिळावा, अशी अपेक्षा मराठा समाजबांधवांनी व्यक्त केली़
संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत गोळवलकर गुरुजी प्रकल्प येथे बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान कडवई व माखजन विभागातील मराठा बांधवांतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार लाड यांनी मराठा समाजाच्या या मागण्यांसाठी विधानसभेत आवाज उठवून मराठा समाजाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले.
या बैठकीत प्रसाद लाड यांनी मराठा आरक्षणाविषयाची संपूर्ण माहिती दिली. तसेच हे आरक्षण मिळवण्यासाठी उभारलेल्या पुढील लढ्याबाबतही माहिती दिली. यावेळी विकास सुर्वे, मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी या लढ्याला राजकारणविरहीत पाठिंबा देणार असल्याचे सांगितले़ भाजपचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी उपस्थितांचे आभार मानले़
यावेळी अनिल मोरे, बापू कदम, शांताराम मोरे, प्रतीक सुर्वे, मिलिंद शिंदे, मंदार साळवी, सुधीर यशवंतराव, स्वप्नील आमकर, जयंत आमकर, मिलिंद चव्हाण, सदानंद ब्रीद यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते.
-----------------------
संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे मराठा आरक्षणासंदर्भात गाेळवलकर गुरूजी प्रकल्प येथे बैठक पार पडली़ यावेळी आमदार प्रसाद लाड यांना मराठा समाजबांधवांतर्फे निवेदन देण्यात आले़