दापोली : राज्य सहकार विभागामार्फत राज्यभर १ जुलै ते ३० सप्टेंबर कालावधीत संस्था सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत दापोलीत ३१ मार्च २०१५पर्यंत १८४ संस्था नोंदणीकृत होत्या. सर्वेक्षणामध्ये यापैकी ५० संस्थांचे कामकाज बंद असल्याचे निदर्शनास आले असून, १३४ संस्था कार्यरत आहेत. कामकाज बंद असलेल्या संस्थांवरील व्यक्तींनी संस्था सुरू ठेवण्यासाठी त्वरित हालचाल न केल्यास या संस्था डिसेंबरपर्यंत अवसायनात काढण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक रोहिदास बांगर यांनी दिली.सहाय्यक निबंधक रोहिदास बांगर, निबंधकांच्या सहाय्यक वेदा मयेकर, लेखा परीक्षक एस. बी. पाटील यांनी प्रत्यक्ष संस्थेत जाऊन सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणामध्ये ४ संस्थांचे कार्य स्थगित आढळून आले. यामध्ये महालक्ष्मी औद्योगिक संस्था हर्णै, जिजाऊ औद्योगिक संस्था, श्री स्वामी समर्थ फलोत्पादन संस्था आणि जिजाऊ कृषी विकास संस्था, दापोली यांचा समावेश आहे. १२ संस्था नोंदणीकृत पत्त्यावर आढळलेल्या नाहीत. यामध्ये औद्योगिक-निवेदिता, जिजामाता, कोकणरत्न, कोकण खनिकर्म औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था दापोली, पाणीवापर संस्था-सोमेश्वर, पाणीवापर संस्था पालगड, मापावली पाणीवापर संस्था, माटवण तर इतर संस्थांमध्ये कोकण विकास स्वयंरोजगार, युगंधरा स्वयंरोजगार, हर्णै-पाज परिसर विकास स्वयंरोजगार, पंचम स्वयंरोजगार, सुवर्णदूर्ग कृषी व ग्रामीण पर्यटन संस्था आणि कोकण भूमी कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी संस्था, दापोलीचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ३४ संस्थांकडून कोणत्याही प्रकारचे अहवाल सहकार निबंधक कार्यालयाकडे प्राप्त होत नसल्याने एकूण ५० संस्थांना टाळे लागणार आहे. पूर्ण क्षमतेने कार्यरत असलेल्या संस्थांमध्ये १३४ संस्थांचा समावेश असल्याची माहिती बांगर यांनी दिली.यामध्ये विकास संस्था-४१, बँक-१, पतसंस्था-२६, कर्मचारी पतसंस्था-२, खरेदी-विक्री संघ-१, कृषी प्रक्रिया उद्योग संस्था-२, पणन संस्था-२, बलुतेदार संघ-१, मजूर संस्था-४, ग्राहक संस्था-४, औद्योगिक संस्था-३, पाणीवाटप व वापर संस्था-१, गृहनिर्माण संस्था-३३ आणि उर्वरीत इतर संस्थांचा समावेश आहे. कार्यस्थगित, नोंदणीकृत पत्त्यावर नसलेल्या संस्था आणि कोणत्याही स्वरूपाचे अहवाल नसलेल्या अशा एकूण ५० संस्थांपैकी ज्या संस्थांना कार्यप्रवण होऊन संस्था जिवीत ठेवायची असेल त्यांनी कृती कार्यक्रमाची रूपरेखा आखून ३१ आॅक्टोबरपूर्वी निबंधक कार्यालयाकडे अहवाल सादर करणे अपेक्षित आहे, असे निबंधक रोहिदास बांगर यांनी सांगितले आहे.कृती अहवाल समाधानकारक वाटल्यास या संस्था पुन्हा उभ्या राहू शकतात. अन्यथा ३१ डिसेंबरपर्यंत या संस्थांनी कोणत्याही स्वरूपाच्या कार्यप्रवण रहाण्याच्या दृष्टीने हालचाली न केल्यास येत्या ३१ डिसेंबरपर्यंत या संस्था अवसायनात काढण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे बांगर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)डिसेंबरपर्यंत कार्यवाही...संस्था काढताना पदाधिकारी ज्या पध्दतीने काम करतात, तेवढाच वेग त्यानंतर राहत नाही. त्यामुळे संस्थांच्या कामकाजात सातत्य राहत नाही. अनेक संस्था मूळ उद्देशापासून भरकटत जातात तर काही संस्था तुटून जातात. त्यानंतर त्यांना कोणीच वाली उरत नाही. रत्नागिरी जिल्ह््यातील अनेक संस्थांची अशीच स्थिती आहे. त्यामुळे या संस्था आता खरोखरच अवसायनात काढण्याची वेळ आली आहे. दापोलीत सहाय्यक निबंधक कार्यालयाने त्याविरूध्द मोहीम सुरु केली आहे.
पन्नास संस्था अवसायनात?
By admin | Updated: October 8, 2015 00:30 IST