रत्नागिरी : अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक शेतावर फिरकलेलेच नाहीत. त्यामुळे खोटे पंचनामे केल्याचा गंभीर आरोप करीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आजच्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत बहुतांश सदस्यांनी धारेवर धरल्याने सभा जोरदारपणे गाजली. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष जगदीश राजापकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतींचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. तसेच भाजीपाला व अन्य फळांचेही नुकसान झाल्याने शेतकरी, बागायतदार चिंतेत आहेत. या नुकसानाचे पंचनामे झाले आहेत का, असा प्रश्न सदस्य उदय बने यांनी उपस्थित केला. त्यावेळी बनेंसह सदस्य राजेश मुकादम, विलास चाळके व अन्य सदस्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक सी. एस. गायकवाड व त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांना चांगलेच घेरले. शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी कृषी विभागाचे अधिकारी, ग्रामसेवक आणि तलाठी यापैकी कोणीही अधिकारी नुकसानग्रस्त शेतावर जाऊन पंचनामे करीत नसल्याचा गंभीर आरोप सदस्यांनी केला. यावेळी बने यांनी सभागृहातील सर्वच सदस्य शेतकरी आहेत. त्यांच्याकडेही पंचनामे करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी व अन्य कोणीही पोहोचलेले नाहीत. त्यामुळे पंचनामे न करता केवळ किती नुकसान झाल्याची आकडेवारी कागदावर सांगितली जात आहे. खराखुरा सर्व्हे करणार आहात ना, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित करताच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी करु ना, असे उत्तर देताच सभागृह अवाक् झाले. त्यानंतर सदस्यांनी कृषी अधीक्षकांना धारेवर धरीत खरीखुरे पंचनामे करा. खोटे पंचनामे हाता कामा नयेत, कामात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. आजच्या सभेत अनेक अधिकारी अनुपस्थित असल्याने पदाधिकारी व सदस्यांनी संताप व्यक्त केला. अनेकदा काही अधिकारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहात नसल्याने सभागृहाने संताप व्यक्त केला. जे कोणी अधिकारी अनुपस्थित आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव करण्यात आला. हा ठराव ग्रामविकास मंत्र्यांकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. राजीव गांधी जीवनदायी अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या उपचारांमुळे रूग्णांची गैरसोय होत आहे. ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. एस. टी.ला वारंवार चालक कमी पडत असल्याने चालक भरतीसाठी इयत्ता दहावी शैक्षणिक पात्रतेची रद्द करुन यामध्ये कमी शिकलेल्या चालकांचीही भरती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.बचत गटांच्या माध्यमातून गरीब, गरजू महिलांची आर्थिक उन्नती होण्यासाठी ठोस उपाययोजना हवी. मात्र, माविमच्या अधिकाऱ्यांना काम करायला नको, असा आरोप करुन सदस्य बने यांनी आपण सुचवलेल्या उपाययोजनांवर अंमलबजावणी आजपर्यंत का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच ९९ टक्के बचत गटांच्या महिला कर्ज फेडण्याचेच काम करीत असल्याचा आरोपही यावेळी बने यांनी केला. यावेळी उपाध्यक्ष सतीश शेवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरिष जगताप, आरोग्य व बांधकाम सभापती डॉ. अनिल शिगवण, शिक्षण व अर्थ सभापती ऐश्वर्या घोसाळकर, महिला व बालकल्याण सभापती प्रज्ञा धनावडे, समाजकल्याण सभापती शीतल जाधव, सदस्या रचना महाडिक, सुजाता तांबे, स्मिता जावकर, मनीषा जाधव, सदस्य अजय बिरवटकर, प्रकाश शिगवण, भगवान घाडगे, विश्वास सुर्वे उपस्थित होते. (शहर वार्ताहर)सर्वसाधारण सभेत कृषी खात्याचे अधिकारी लक्ष महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सन २०१४-१५ च्या पूरक आराखड्यास शासनाने थेट मंजूरी दिल्याने सभागृहात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या सभेला उपजिल्हाधिकारी (रोहयो) सभेला अनुपस्थित होत्या. त्यामुळे ३० एप्रिल रोजी मग्रारोहयो अध्यक्षांच्या दालनात बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपजिल्हाधिकारी अनुपस्थित राहिल्यास त्यानंतरची बैठक मुंबईत ग्रामविकासमंत्र्यांबरोबर घेण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.
कृषी विभागाकडून खोटे पंचनामे
By admin | Updated: March 28, 2015 00:06 IST