रत्नागिरी : गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था स्थिती उत्तम राखण्यासाठी व कोणत्याही शांतता बिघडवणाऱ्या व देशविघातक कृती घडू नयेत, यावर लक्ष ठेवण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावरील खेड ते सावंतवाडीपर्यंतच्या पाच रेल्वे स्थानकांवर सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविण्यात आले होते. याबाबतचा करार पूर्ण झाल्याने रविवारी हे कॅमेरे काढण्यात आले असून, पुन्हा दिवाळीत या स्थानकांवर कॅमेरे बसविले जाणार असल्याची माहिती कोकण रेल्वेच्या सुत्रांनी दिली. गणेशोत्सवकाळात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या संख्येने गणेशभक्त ये-जा करतात. त्या काळात महत्त्वाच्या स्थानकांवर कोणत्याही प्रकारे देशविघातक घटना घडू नयेत, अशा प्रवृत्तींना थारा मिळू नये व त्यांच्यावर करडी नजर राहावी, यासाठी खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी या पाच प्रमुख रेल्वे स्थानकांवर अनेक ठिकाणी सी. सी. टी. व्ही.कॅमेरे बसविण्यात आले होते. रत्नागिरीतीलच ठेकेदाराकडे सी. सी. टी. व्ही. बसविण्याचे कंत्राट देण्यात आले होते. त्याबाबतचा करार संपुष्टात आल्यानंतर काल (रविवारी) ही यंत्रणा ठेकेदाराकडून काढून घेण्यात आली असून, पुन्हा दिवाळी, नाताळ या सणाच्या काळातही ही सेवा सुरु केली जाणार आहे. कोकण रेल्वेवरील प्रवास सुखकर व्हावा, प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये. तसेच राष्ट्रीय मालमत्ता असलेल्या कोकण रेल्वेचे कोणतेही नुकसान होऊ नये, यासाठी अशा देशविघातक प्रवृत्तींवर लक्ष ठेवण्यासाठी ही यंत्रणा बसविण्यात आली होती, असे रेल्वेच्या सुत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)बोगद्यांमध्येही सी.सी.टी.व्ही?कोकण रेल्वे मार्गावर बोगद्यांची संख्याही मोठी आहे. बोगद्यांमध्ये दगड, दरड कोसळू नये म्हणून वेगळे स्टोन फिटिंग तंत्रज्ञान वापरण्यात आलेले आहे. या बोगद्यांमधून काही अपप्रवृत्तींना विरोधी गतविधि करता येऊ नयेत, अशा संभाव्य कारवाया रोखल्या जाव्यात तसेच बोगद्यांमध्ये असलेले धोके आधीच दिसावेत, लक्षात यावेत यासाठीही ही यंत्रणा बसविण्याबाबत रेल्वे प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे.
रेल्वे स्थानकांवर दिवाळीतही कॅमेराचे डोळे
By admin | Updated: September 16, 2014 23:22 IST