रत्नागिरी : क्रांतीनगर येथील रत्नागिरी सहकारी गृह कुटीर संस्थेतील ११६ घरांच्या मुदतवाढीचा प्रश्न उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी निकाली काढला आहे. पुढील ३० वर्षांसाठी मुदतवाढ देताना येथील रहिवाशांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.क्रांतीनगर येथील रत्नागिरी सहकारी गृह कुटीर संस्थेत राहणाऱ्या ११६ रहिवाशांचा भाडे करार नोव्हेंबर २०२२ मध्ये संपुष्टात आला होता. भाडे करार संपुष्टात आल्याने ११६ कुटुंबांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब येथील स्थानिक लोकप्रतिनिधी शिल्पा सुर्वे, सौरभ मलुष्टे, दीपक पवार, पूजा पवार, प्रशांत सुर्वे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कानावर घातली. मंत्री सामंत यांनी तत्काळ या प्रश्नाचे गांभीर्य ओळखत मुंबईत मंत्रालय येथे बैठक आयोजित केली.उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत ११६ घरांचा भाडेपट्टा करार नूतनीकरण करण्याबाबत तसेच अस्तित्वात असलेल्या घरांवर कर्ज प्रकरण मंजूर व्हावे, यासाठी सातबाराच्या इतर हक्कांमध्ये नावाचा समावेश करण्यासंदर्भात चर्चा झाली. चर्चेअंती सद्य:स्थितीत भाडेपट्टा करार तीस वर्षांकरिता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत, जिल्हा महिला संघटक शिल्पा सुर्वे, शहर संघटक सौरभ मलुष्टे, पूजा दीपक पवार, प्रशांत सुर्वे, दीपक पवार, संस्थेचे अध्यक्ष मौलवी नदाफ, सुनील शिवलकर, रामचंद्र कदम, नागेश चिकोडीकर, अशोक शेंगणी आणि श्रीपाद सावंत उपस्थित होते.
रत्नागिरीतील क्रांतीनगर येथील ११६ घरांच्या भाडेपट्टा कराराला मुदतवाढ, रहिवाशांना मोठा दिलासा
By अरुण आडिवरेकर | Updated: December 1, 2022 18:43 IST