बसस्थानकामध्ये गैरसोय
खेड : शहरातील बसस्थानकांत विविध गैरसोयी असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. विजेचे पंखे, दिवे, नादुरूस्त आहेत. पाण्याचा कूलर उपलब्ध आहे, परंतु वीजपुरवठा नसल्याने पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. उन्हाळा सुरू झाला असून, उकाड्याने प्रवासी त्रस्त होत असून, एस. टी. प्रशासनाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
डांबरीकरणाकडे दुर्लक्ष
राजापूर : राजापूर रेल्वेस्टेशन व कोंड्ये पांगरे हसोळ रस्त्याला जोडणारा पांगरे रस्ता दुर्लक्षित असून, डांबरीकरणाची मागणी गेली कित्येक वर्षे धूळ खात पडून आहे. गेली दहा वर्षे ग्रामपंचायत व ग्रामस्थ पत्रव्यवहार करून मागणी करीत असले, तरी प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. किमान पावसाळ्यापूर्वी तरी रस्ता दुरूस्तीचे काम मार्गी लावण्याची मागणी होत आहे.
संतोष जाधव यांची निवड
खेड : तालुक्यातील धामणदिवी जिल्हा परिषद आदर्श शाळा क्रमांक १ चे क्रीडा शिक्षक संतोष जाधव यांची राज्यस्तरीय योगा पंचपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोसियशन सलग्न नॅशनल योगासन स्पोर्टस् फेडरेशन मान्यताप्राप्त युवक व क्रीडा मंत्रालयातर्फे नुकतेच ऑनलाईन पंच मार्गदर्शन घेण्यात आले. संतोष जाधव यांना ९२ टक्के गुण प्राप्त झाले असून, गुणवत्तेनुसार त्यांची निवड करण्यात आली आहे.
सागरी महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
राजापूर : तालुक्यातील नाटे व जैतापूर सागरी महामार्गावरील खड्डयांमुळे वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. धाऊलवल्ली तिठा ते कुवेशी तिठादरम्यान एक फुटाचे खड्डे असून, खड्डेमय रस्त्यातून वानह चालविणे अवघड बनले आहे. वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
पाण्याची समस्या मार्गी
खेड : तालुक्यातील शिरवली गुरववाडी व धाडवेवाडी, बोरघर भंडारवाडी मोहल्ला येथे विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. तीनही वाड्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई असून, ग्रामस्थांच्या मागणीनुसार या वाड्यांचा प्राधान्याने विचार करून मंजुरी देण्यात आली आहे. बिजघर गावातही पाण्याची समस्या भेडसावत असून, विहिरीसाठी मान्यता दिली आहे. लवकरच या कामांना प्रारंभ होणार आहे.
न्याय देण्याची मागणी
रत्नागिरी : प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये समाविष्ट करून न्याय मिळवून देण्याची मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डी. के. सावंत यांनी केली आहे. कोकण रेल्वे प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी देताना सफाई कामगार म्हणून नोकरी देण्यात आली आहे. कोकणात सुशिक्षित उमेदवार नसल्याने कारण सांगून कोकणावर रेल्वे प्रशासनाकडून अन्याय होत आहे.
प्रथमोपचार साहित्य वाटप
हातखंबा : महामार्गावरील अपघातग्रस्त प्रवाशांना तातडीने मदत व सेवा मिळण्यासाठी महामार्गावरील मृत्युंजय ग्रुपना प्रथमोपचार साहित्य व स्ट्रेचरचे वाटप महामार्ग पोलीस मदत केंद्र हातखंबातर्फे करण्यात आले. निवळी, हातखंबा, लांजा, नाणिज, दाभोळे ग्रुपसाठी स्ट्रेचरची व्यवस्था वालावलकर ट्रस्ट व प्रथमोपचार साहित्याची उपलब्धता अल्ट्राटेक सिमेंटतर्फे करण्यात आली.
खबरदारीचे आवाहन
रत्नागिरी : महावितरण कंपनीतर्फे खेड विभागात उभारण्यात आलेली दस्तुरी ते रजवेल ३३ के.व्ही. उपरी तारमार्ग विद्युतवाहिनी दि. १२ एप्रिल रोजी किंवा त्यानंतर केव्हाही विद्युतभारित करण्यात येणार आहे. त्यामुळे दस्तुरी, चिंचघर, खारी, सुसेरी, नांदगाव, कोरेगाव, मुंबके, शिर्शी कर्जी, आमशेत, परिसरातील ग्रामस्थांनी संबंधित वाहिनीच्या पोल, ताणे, आर्थिंग आदी उपकरणांना स्पर्श करू नये. शिवाय खांब, ताणे यांना जनावरे किंवा बैलगाडी न बांधता खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शीतपेयाच्या खपावर परिणाम
रत्नागिरी : कोरोना रुग्णवाढीची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. कोरोनाची भीती जनमानसात वाढली असल्याने शीतपेयाच्या खपावर परिणाम झाला आहे. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी उकाडा वाढला असला तरी, शीतपेये, आईस्क्रिम खाणे टाळत आहेत. व्यवसायावर परिणाम झाला असल्याने विक्रेते मात्र धास्तावले आहेत.