मेहरुन नाकाडे --रत्नागिरी --थेट बसफेरीला प्रवासी भारमान नसल्यास ती फेरी बंद करण्याचा निर्णय राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतल्याने रत्नागिरी विभागातील एकूण १४ फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकी २५ चालक व वाहक कमी झाले आहेत. तसेच दिवसाला अडीच लाख याप्रमाणे रत्नागिरी विभागाचे महिनाभराचे तब्बल ७५ लाखांचे नुकसान झाले आहे.प्रत्येक आगारातून जिल्ह्याबाहेर काही थेट फेऱ्या सुरू आहेत. या गाडीतून थेट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अत्यल्प असली तरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी नाही. किंबहुना चांगल्या भारमानामध्ये ही एस्. टी. सेवा सुरू होती. परंतु, महामंडळाने जुलै महिन्यामध्ये थेट प्रवासी नसल्यास अशा फेऱ्या बंद करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय सर्व आगारांमध्ये जारी करण्यात आला. त्यामुळे चांगल्या भारमानात सुरू असलेल्या गाड्या चक्क बंद कराव्या लागल्या. थेट प्रवासी नसल्यामुळे रत्नागिरी विभागातून नियमित सुटणाऱ्या १४ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे २५ चालक व २५ वाहक कमी झाले आहेत. रत्नागिरी विभागातर्फे या चालक व वाहकांना सेवेत सामावून घेतानाच त्यांना अन्य ठिकाणी ड्युटी देण्यात आली आहे. विभागातील १४ फेऱ्या रद्द झाल्यामुळे दरदिवशी ११ हजार किलोमीटरचा प्रवास थांबला आहे. या फेऱ्या रद्द झाल्याने त्या मार्गावरील भारमान घटले आणि त्याचा परिणाम विभागाच्या आर्थिक उत्पन्नावर झाला. प्रतिदिन अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. याअंतर्गत सकाळी ९ वाजता सुटणारी दापोली - अक्कलकोट, सायंकाळी ७.१५ वाजता सुटणारी खेड - मुंबई, सायंकाळी ७ वाजता सुटणारी खेड - लातूर, पहाटे ५ वाजता सुटणारी चिपळूण - परळी, सकाळी ७.४५ वाजता सुटणारी गुहागर - अक्कलकोट, सकाळी १० वाजता सुटणारी गुहागर - जत, सकाळी ६.१५ वाजता सुटणारी गुहागर - विजापूर, सायंकाळी ७ वाजता सुटणारी करजुवे - मुंबई, सायंकाळी ८.१५ वाजता सुटणारी देवरूख -मुंबई, सकाळी ७.३० वाजता सुटणारी रत्नागिरी - लातूर, दुपारी १.१५ वाजता सुटणारी रत्नागिरी - हुबळी, सकाळी ७.४५ वाजता सुटणारी राजापूर - पोलादपूर, सकाळी ६ वाजता सुटणारी मंडणगड - उस्मानाबाद, रात्री ८ वाजता सुटणारी मंडणगड - कोल्हापूर या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागात ८२२ गाड्या असून, ९ हजार ५४४ फेऱ्यांद्वारे दररोज २५ लाख प्रवाशांची वाहतूक होते. रत्नागिरी विभागाचे दैनंदिन ४० ते ४५ लाख रुपयांचे उत्पन्न आहे. दि. १५ जुलैपासून १४ फेऱ्या रद्द झाल्यामुळे या उत्पन्नात घट झाली आहे. फेऱ्या रद्दचा फटका या विभागाला बसला आहे.भारमान कमी : थेट प्रवाशांचाच विचारथेट बसफेरीला प्रवासी भारमान नसल्याचे कारण पुढे करून रत्नागिरी विभागातील १४ फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. या फेऱ्या बंद केल्याने खासगी गाड्यांचे भारमान वाढले आहे. या फेऱ्या बंद करताना महामंडळाने केवळ थेट प्रवाशांचाच विचार केल्याचे दिसून आले आहे.
एस्. टी.चे रोज अडीच लाखांचे नुकसान
By admin | Published: August 17, 2016 10:06 PM